Tenth, twelfth offline exams are welcome; Anxiety due to corona
Tenth, twelfth offline exams are welcome; Anxiety due to corona

दहावी, बारावी ऑफलाईन परीक्षांचे स्वागतच; कोरोनामुळे चिंता

सांगली ः कोरोनाचा मोठा परिणाम शिक्षणावर झाला. यंदा तब्बल आठ महिने शाळा, महाविद्यालय बंद राहिली. शिक्षण संस्थांनी ऑनलाईनने अध्यापन केले. काही विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनसाठी आवश्‍यक असणारी साधने नव्हती, हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने दहावी, बारावी ऑफलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विशेषतः बारावीकडे करिअरचे वर्ष म्हणून पाहिले जाते. या परीक्षेबाबत पालक चिंतेत आहेत. सध्या कोरोना रुग्ण वाढत असल्याने दीड महिन्यांनी काय स्थिती असेल, परीक्षा कशा होतील, याबाबत आताच काही बोलणे कठीण आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मात्र ऑफलाईन परीक्षेचे स्वागतच केले आहे. 


जिल्हा आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. जिल्ह्यात सोमवारी 84 रुग्ण सापडल्याने पुन्हा धोका वाढतोय हे स्पष्टपणे जाणवू लागले. पालकमंत्री जयंत पाटील यांनी गतवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 16 मार्च 2020 पासून शाळा बंदचे आदेश दिले होते. राज्य परीक्षा महामंडळाने 12 वी परीक्षा 23 एप्रिल 2021 तर 10 वी परीक्षा 30 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. दहावी, बारावीचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांपेक्षा सध्या पालकांत मोठी धास्तीचे वातावरण आहे. काही पालकांना कोरोनाच्या स्थितीत परीक्षा पुढे ढकलाव्यात यासह शिक्षण व्यवस्थेचा फेरआढावा घ्यावा, असाही मतप्रवाह आहे. 


यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उच्च शिक्षणात ऑनलाईन अध्यापनाची स्तरावर अंमलबजावणी केली. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम कमी करणे, ऑनलाईन-ऑफलाईन परीक्षा घेणे या सर्व तात्पुरत्या उपाययोजना समोर होत्या. बदलते तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धीत शिक्षण व्यवस्था या सर्वांचा फेरविचार करण्याचा धडा कोरोनाने दिला आहे. 

मुलांनी चांगला अभ्यास केला आहे
कोरोना साथीत बोर्डाने दिलेल्या मॉडेल प्रश्‍न संचाचा अभ्यास केला, तरी दहावीत चांगल्या गुणांनी पास होता येईल. बारावीसाठीही प्रश्‍नसंच मार्गदर्शक ठरतील. नीट, सीईटीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सारखाच वेळ मिळणार आहे. गुण कमी किंवा जास्त सर्वांसाठीच समान असतील. पालकांची भीती अनाठायी आहे. 11, 12 वीतील विद्यार्थ्यांनी समजून घेऊन अभ्यास करावयाचा आहे. कारणे देणाऱ्यांची संख्या वगळता मुलांनी चांगला अभ्यास केला आहे. 
- प्रा. एम. एस. रजपूत, रजपूत शिक्षण संस्था 

विचार करून निर्णय घ्यावा. 
कोरोनाच्या सद्य:स्थितीचा विचार करून परीक्षांबाबत निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. कोरोना वाढीच्या काळात परीक्षा पुढे ढकलावी, असे वाटते. अर्थात ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन होणार नाही. ऑफलाईन परीक्षेचा निर्णय योग्यच आहे. महामंडळाने दीड महिन्यांनी उद्‌भवणाऱ्या स्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा. 
- रावसाहेब पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ 

नियोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावीच लागेल

बोर्डाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. ऑफलाईन परीक्षा स्वागतार्ह आहेत. कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करून परीक्षा होतील. पारंपरिक परीक्षा वेळेपेक्षा यंदाच्या परीक्षांकडे वेगळ्या दृष्टीने पाहून नियोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावीच लागेल. काठिन्य पातळीऐवजी सुलभतेचा विचार केला जाईल असे वाटते. 
- बाळासाहेब शेटे, माजी सचिव, कोल्हापूर माध्यमिक परीक्षा बोर्ड 

परीक्षा निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे
कोरोना परिस्थितीचा विचार करुनच परीक्षा महामंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. करियरसाठी 12 वीचे वर्षाला फार महत्त्व असते. पुढील जीवनाची दिशा यावर ठरत असल्यामुळे याकडे विद्यार्थ्यांपेक्षा पालकांची भीती अनाठायी वाटते. यामध्ये मुले, पालकांची नकारात्मकता सोडली तर ऑफलाईन परीक्षा निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. बारावी परीक्षेनंतरही सीईटी, नीटसाठी अवधी सर्वांनाच मिळणार आहे. 
- प्रा. महावीर मुळे, निवृत्त प्राध्यापक, रयत शिक्षण संस्था 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com