उपचार करायचाय, आधी कोरोना चाचणी करा...

बलराज पवार 
Monday, 7 September 2020

कोरोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन कसून प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी प्रशासनाने शासकीय आणि खासगी अशी 39 रुग्णालये अधिग्रहीत केली आहेत.

सांगली : कोरोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन कसून प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी प्रशासनाने शासकीय आणि खासगी अशी 39 रुग्णालये अधिग्रहीत केली आहेत. मात्र कोरोना नसलेल्या रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालये कोरोना चाचणी करण्याचा आग्रह धरत आहेत. त्याशिवाय उपचारास नकार देत असल्याने नॉन कोविड रुग्णांची पंचाईत झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढला आहे. आजवर 16 हजारांवर रुग्णसंख्या गेली. आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याशिवाय प्रशासनासमोर पर्याय नाही. महापालिका क्षेत्रातील अनेक मल्टीस्पेशालिटी तसेच आयसीयु, ऑक्‍सिजन, व्हेंटीलेटरची सोय असलेली हॉस्पिटल अधिग्रहीत करण्यात येत आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची सोय झालीय. 

प्रशासनाने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळण्यासाठी महापालिका क्षेत्रातील 15 तर ग्रामीण भागातील 24 रुग्णालये अधिग्रहीत केलीत. तेथे कोरोनाबाधितांवर उपचार सुरु केले आहेत. पण, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे आता नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शिवाय उरलेले खासगी हॉस्पिटलही जास्त गर्दी होऊ नये तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी रुग्णांना गरजेचे असेल तरच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये येण्याची सूचना करीत आहेत. तर काही डॉक्‍टरांनी ऑनलाईन सल्ला देणे सुरु केले आहे. 

 

चाचणीचा आग्रह 
या सगळ्यात आता गंभीर आजाराच्या रुग्णांना मात्र कोरोना चाचणी केल्याशिवाय डॉक्‍टर रुग्णांना तपासण्यास, दाखल करुन घेण्यास नकार देत आहेत. रुग्ण तपासण्यास विरोध नाही. पण सध्याच्या महामारीच्या काळात कोण कोरोनाबाधित आहे आणि नाही हे समजणे अवघड आहे. लक्षणे नसलेलेही अनेकजण बाधित असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एखादा कोरोनाची लक्षणे नसलेला रुग्ण आला तरी आधी त्यांना कोरोना चाचणीचा करुन येण्याची सूचना केली जात आहे. त्याच्या अहवालावरच पुढे उपचार आपण करायचे की कोविड हॉस्पिटलला पाठवायचे हे ठरते. 

रुग्ण, नातेवाईकांची फरफट 
खासगी रुग्णालयात कोरोनाच्या भीतीने चाचणी केली नसल्यास उपचारासाठी दाखल करुन घेतले जात नसल्याने रुग्णांची फरफट होत आहे. रुग्णांना घेऊन नातेवाईकांची धावाधाव सुरु आहे. खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना घेतले जात नाही. त्यामुळे नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये जावे लागते. तेथे या रुग्णांची लक्षणे कोरोनाशी मिळती जुळती असल्यास आधी चाचणी करुन घेण्यास सांगण्यात येते. मात्र अँटीजेन चाचण्यांची विश्‍वासार्हता 50 टक्‍केच आहे. तर आरटीपीसीआर चाचणी अहवालास चार ते पाच दिवस लागतात. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास विलंब होत आहे. त्यातून रुग्ण दगावण्याचा धोका आहे. 

 "कोरोनाची चाचणी न करता आलेल्या रुग्णांवर उपचार करताना काही डॉक्‍टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारीही दडपणाखाली घाबरतात. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगण्यात येते. सध्याची गोंधळाची परिस्थिती पाहता सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.'' 
-डॉ. एस. डी. मालगावे, अध्यक्ष, आयएमए, सांगली. 

"प्रशासनाच्या नियोजनाअभावी ही बिकट परिस्थिती आली आहे. नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी प्रशासनाने निर्णय घेण्याची गरज आहे. या रुग्णांना कोरोनाची चाचणी केल्याशिवाय खासगी रुग्णालयात उपचार केले जात नाहीत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात जाण्याची वेळ येते. या रुग्णांसाठी प्रशासनाने एक स्वतंत्र हॉस्पिटल उभा करावे.'' 
- सतीश साखळकर, कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समिती प्रमुख 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Test corona before treatment ...