धन्यवाद! दुसऱ्यांचे आयुष्यच आपण धोक्‍यात आणता!! 

Thanks! You risk others' lives !!
Thanks! You risk others' lives !!

नगर : पोलिसांसोबत उभ्या असलेल्या तरुणांकडून वाहन अडविले जाते. त्यांच्याकडून एक सन्मानपत्रही मिळते. नेमके कशाबद्दल कौतुक केले, म्हणून त्या प्रमाणपत्राचे वाचन करतानाच समोरून छायाचित्रण सुरू असते. सरतेशेवटी कळते, की वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जनजागृती म्हणून भर चौकात रस्त्यावरच उपरोधिक सन्मान सोहळा सुरू आहे. खासगीसह सरकारी वाहनेही आज या "कौतुक' सोहळ्याची लक्ष्य ठरली! 

रस्त्यांवरील वाढते अपघात बहुतांश वेळा केवळ वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन केल्यानेच वाढत असल्याचा पोलिस विभागाचा अहवाल आहे. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी सकाळ सोशल फाउंडेशन, रेडिओ सिटी व ब्रॅंड मेकर यांच्या वतीने पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या सहकार्याने वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना वाहतूकविषयक नियमांची जाणीव करून देण्यासाठी उपरोधिक सन्मानपत्रे देण्यात आली. 

"सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक शिरसाठ, "रेडिओ सिटी'चे प्रसन्ना पाठक, रेडिओ सिटीचा आशुतोष, मार्केटिंग अधिकारी धनेश खत्ती, पोलिस कॉन्स्टेबल तुकाराम खरमाटे व पोलिस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. 

नगरमधील सर्वाधिक धोक्‍याची वाहतूक असलेल्या नगर-मनमाड रस्त्यावरील पत्रकार चौकात आज सकाळी ही मोहीम राबविण्यात आली. खासगी वाहनांच्या चालकांसह सरकारी वाहनांनाही पोलिसांच्या साक्षीने आज उपरोधिक प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यात मुख्यत्वे सीटबेल्ट न लावता वाहने चालविणाऱ्यांना सीट बेल्ट न लावता होणाऱ्या अपघातांची जाणीव करून दिली. 
 
यांचाही केला उपरोधिक सन्मान..! 
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांमध्ये आज सरकारी वाहनेही आढळून आली. त्यातही नगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे वाहनचालक सुनील मेढे, पोलिसांच्याच व्हॅनचे चालक गौतम डुचे, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे व्हॅनचालक बाबूराव हराळ, नगर महापालिका बससेवेचा चालक आदींचा समावेश होता. सरकारी वाहनचालक नेहमीच या कारवाईतून सुटतात. त्यामुळे त्यांच्याकडूनही वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याबद्दल या वेळी उपस्थितांनी चिंता व्यक्त केली. 

असा आहे प्रमाणपत्रातील मजकूर...! 
सन्माननीय नगरकर, आपण गाडी चालविताना वाहतुकीच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या आयुष्याला धोक्‍यात आणत आहात. आपला व आपल्या परिवाराचा कोणताही विचार न करता आपण शहरातील दुसऱ्यांचेदेखील आयुष्य धोक्‍यात आणण्यासाठी जबाबदार असल्याने हे प्रमाणपत्र आपणास सन्मानपूर्वक देण्यात येत आहे. 
आपणास माहीत आहे का? खाली दिलेल्या सर्व गोष्टींसाठी दंड आकारण्यात येतो. 


- डोक्‍यात हेल्मेट न घालता गाडी चालविणे. 
- विना लायसन्स गाडी चालविणे. 
- सीट बेल्ट न लावणे. 
- वय नसताना व लायसन्स नसताना गाडी चालविणे. 
- गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे. 
 
परवानाच नसताना वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोठी मोहीम उघडली आहे. त्यातही कनिष्ठ महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या कुणाकडेच वाहन चालविण्याचा परवाना नसतो. त्यामुळेही अपघातांची संख्या वाढत आहे. विशेषत: अशा मुलांवर कडक कारवाईचे धोरण घेतले आहे. सीट बेल्ट, विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम उघडली आहे. 
- अविनाश मोरे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com