Belgaum : मद्यपी वाहनचालकांची गाडी सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drunk and drive case

मद्यपी वाहनचालकांची गाडी सुसाट

बेळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास वाहतूक पोलिस नेहमीच आघाडीवर असतात. मात्र, कोरोनामुळे पोलिसांनी यंदाही सावध भूमिका घेत वर्षभरात एकाही मद्यपी वाहनचालकावर कारवाई केलेली नाही. त्याचा गैरफायदा मद्यपी वाहनचालकांनी उठविण्यास सुरुवात केली आहे. अशा वाहनचालकांमुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.

मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांवर यापूर्वी इंटरसेप्टर वाहनाद्वारे नजर ठेवली जात होती. तसेच संबंधितांकडून एक हजार रुपये दंड घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार वाहने सोडली जात होती. मात्र, नवीन वाहतूक कायद्याच्या नियमानुसार मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्यास संबंधितांची वाहने जप्त केली जातात. त्यानंतर न्यायालयात दहा हजार रुपयांचा दंड भरून वाहन सोडवून घ्यावे लागते. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग कायम होता.

या काळात अनेक वाहतूक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पोलिस रस्त्यावर उतरून वाहनचालकांवर कारवाई करण्यास धजावत नव्हते. समोरासमोर कारवाई करण्याऐवजी सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नोटिसा पाठविण्यात येत होत्या. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांची तपासणी ब्रेथ ॲनालायझर मशिनच्या माध्यमातून करावी लागते. मात्र, तोंडावरील मास्क काढून करावी लागणारी ही चाचणी धोकादायक असल्याने पोलिसांनी ही जोखीम घेण्याचे टाळले.

जानेवारीपासून आतापर्यंत एकाही मद्यपी वाहनचालकावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलेली नाही. ड्रिंक अँड ड्राइव्ह (डीडी) केस घालण्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याचा गैरफायदा मद्यपी वाहनचालकांनी उठविण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करुन बेदरकारपणे वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून सातत्याने ठिकठिकाणी लहान-मोठे अपघात घडत आहेत. मद्यपी वाहनचालकांवर वचक ठेवण्यासाठी ही कारवाई पुन्हा सुरू करावी, असे मत सर्वसामान्यांतून व्यक्त केले जात आहे.

‘कर्णकर्कश’ वाहनांकडे लक्ष

वाहतूक पोलिसांनी सध्या कर्णकर्कश सायलेन्सर असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यावर अधिक भर दिला आहे. वाहतूक दक्षिण आणि उत्तर पोलिसांनी १ नोव्हेंबर ते आतापर्यंत एकूण ३४ वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे. तसेच ही वाहने पुढील कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन खात्याकडे (आरटीओ) सुपूर्द केली आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग कायम असल्याने खबरदारी म्हणून वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे वर्षभरात एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

- पी. व्ही. स्नेहा,

पोलिस उपायुक्त (गुन्हे व वाहतूक शाखा)

loading image
go to top