Belgaum : ‘टेक हब’अभावी विकासाचे स्वप्न अधुरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

‘टेक हब’अभावी विकासाचे स्वप्न अधुरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : विकासाचे स्वप्न पाहत असलेल्या बेळगाव जिल्ह्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र (टेक हब) मंजूर होऊन दोन वर्षे उलटली आहेत. मात्र, प्रकल्प उभारण्यासाठी अद्याप जागा मंजूर झालेली नाही. दरवर्षी हजारो युवकांना थेट रोजगार मिळवून देण्यासह कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या तंत्रज्ञान केंद्रासाठी २० एकर जमीन उपलब्ध करुन देण्यास राज्य सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यासाठी मंजूर झालेला २०० कोटी रुपयांचा निधी केंद्राकडे परत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

दक्षिण भारतातील दुसरे तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने बेळगाव जिल्ह्याची निवड केली. त्यासाठी २० एकर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. जिल्हा औद्योगिक केंद्राकडून (डीआयसी) जागा शोधण्यासाठी प्रयत्न असले तरी राजकीय हस्तक्षेपामुळे हे शक्य झालेले नाही. प्रथम कित्तूर औद्योगिक प्रदेशाची टेक हब स्थापन करण्यासाठी पाहणी करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात पिरनवाडी येथे जागेची पाहणी करण्यात आली. मात्र, राजकीय बळाचा वापर करुन पिरनवाडीजवळील जागेऐवजी ऑटोनगरातील औद्योगिक वस्तू प्रदर्शनाची इमारत दाखविण्यात आली. तंत्रज्ञान केंद्र स्थापनेसंदर्भात पाहणीसाठी लघु व मध्यम औद्यागिक विभागाच्या पथकाने गेल्यावर्षी जानेवारीत बेळगावात पाहणी केली असता या इमारतीचा परिसर केवळ १४ एकर होता. त्यामुळे या जागेची निवड करण्यात आली नव्हती.

प्रकल्प उभारण्यासाठी २० एकर जागेची आवश्‍यकता असल्याचे केंद्राने स्पष्ट केल्यामुळे प्रकल्पासाठी पूरक जागा दाखविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनाही अपयश आले होते. त्यानंतर कोरोनामुळे योजनांची कामेच नव्हे, तर त्यासंबंधीचा विचारही थांबला होता. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने पुन्हा सरकारी योजनांना गती येत आहे. त्यामुळे आता टेक हब बेळगावात स्थापन करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, जागेची उपलब्धता झाली तरच बेळगावात ही योजना कार्यान्वित होणार आहे.

तंत्रज्ञान केंद्रात काय?

या टेक हबमध्ये कौशल्य विकास केंद्र, निवासी उद्योग केंद्र, महाविद्यालय अशा प्रकारची केंद्रे असतील. याशिवाय तांत्रिक कर्मचारी, अभियंत्यांना प्रशिक्षण, जर्मनी तंत्रज्ञान केंद्राच्या धर्तीवर येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अत्याधुनिक उपकरणे याशिवाय तज्ज्ञ अभियंते, विद्यार्थी व स्ट्रार्टअपना या केंद्राचा उपयोग होणार आहे. प्रतिवर्षी एक हजार विद्यार्थ्यांना या केद्रातून प्रशिक्षण मिळणार आहे.

loading image
go to top