esakal | sangli शाळेची घंटा वाजली आता लालपरीची ‘डबल बेल’
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेची घंटा वाजली आता लालपरीची ‘डबल बेल’

शाळेची घंटा वाजली आता लालपरीची ‘डबल बेल’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजली असून आता लालपरीची ‘डबल बेल’ शहरीसह ग्रामीण भागात ऐकण्यास येईल. शाळकरी मुलांच्या वाहतुकीसह ग्रामीण मुक्कामी बसेस धावताना दिसतील. जवळपास दीड वर्षानंतर एसटीच्या ९० टक्के हून अधिक फेऱ्या सुरू झाल्याचे चित्र दिसून येईल. त्यामुळे एसटीचे आतापर्यंत झालेले नुकसान भरून येण्यास सुरवात होईल.

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटीचे चाक जागेवर थांबले होते. अत्यावश्‍यक सेवेसाठी लालपरी धावत होते. लॉकडाऊन, ॲनलॉक त्यानंतर ब्रेक द चेन अंतर्गत प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले होते. काही दिवस ५० टक्के क्षमतेने त्यानंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली. परंतू शाळा, महाविद्यालये सुरू नसल्यामुळे पूर्ण फेऱ्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या. सध्या लांब पल्ला, मध्यम पल्ला यासह शटल सेवा सुरू आहेत.

शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतू जिल्ह्यात २० सप्टेंबरपासूनच शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना बसेस सुरू होण्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. एसटी प्रशासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळकरी, कॉलेज विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या देखील सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी, नोकरदार आणि इतर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास दीड वर्षे एसटीच्या फेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू नव्हत्या. सध्या ७० टक्केपर्यंत फेऱ्या सुरू झाल्या आहेत. परंतू आता शाळा, कॉलेज विदयार्थ्यांबरोबर मुक्कामी गाड्या सुरू होणार असल्यामुळे ९० टक्केहून अधिक फेऱ्या सुरू राहतील असे चित्र आहे. एसटी पूर्ण क्षमतेने धावू लागल्यामुळे आतापर्यंत झालेले नुकसान थोड्या प्रमाणात का होईना भरून निघणार आहे. शाळांची घंटा वाजल्यामुळे आता लालपरीतील ‘डबल बेल’ ही ऐकण्यास येईल. प्रवाशांच्या ‘सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन लालपरी सर्वत्र धावताना दिसेल.

सध्याची स्थिती

  1. रोज धावणाऱ्या गाड्या- ५४१

  2. रोजच्या गाड्यांच्या फेऱ्या- २१३८

  3. रोजचे किलोमीटर- १ लाख ६९ हजार ५७७

  4. रोजचे उत्पन्न- ५ लाख ८४ हजार २६७ रूपये

loading image
go to top