चोरट्यांनी साधला डाव ; एकाच वेळी तीन दुकानात केली, दहा लाखाची चोरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

वरील तिन्ही दुकानातून सरासरी 11 लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेले.

झरे (सांगली) : आटपाडी येथील कराड पंढरपूर महामार्गलगत बसस्थानक समोरील सद्गुरु मेडिकल, अपना ज्वेलर्स व फॅशन हाऊस या तिन्ही दुकानांमध्ये पहाटे पावणे पाचच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्यात आली.

आज सकाळी सद्गुरु मेडिकलचे मालक सुरेश नामदेव चवरे नेहमीप्रमणे सकाळी मेडिकल उघडण्यासाठी गेले असता मेडिकलचे शटर गजाच्या साह्याने फोडलेले दिसून आले. 
दुकानातील सरासरी दहा हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही  फुटेज तपासले असता, पहाटे चोरांनी दुकानांमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले.

हेही वाचा - देशमुख विरुध्द लाड: बहुरंगी लढतीत सांगली ‘पदवीधर’चे कुरूक्षेत्र -

सद्गुरु मेडिकलच्या शेजारी सतीश दशरथ मेटकरी यांचे आपना ज्वेलर्सचे दुकान आहे. त्या ज्वेलर्समध्ये खिडकीचा गज कापून प्रवेश केला असल्याचे निदर्शनास आले. कारण गजाच्या साह्याने शटर उचकटलेले नसल्याने खिडकीचा गज कापून दुकानांमध्ये प्रवेश करुन दागिने लंपास केले. यामध्ये पंचनामा करताना  8 लाख 77 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले.

जवळच सुरज आनंदा सकट यांचे फॅशन हाऊसचे दुकान आहे. या दुकानातील 1 लाख 32 हजार रुपयांची रेडिमेट कपडे चोरीला गेली. वरील तिन्ही दुकानातून सरासरी 11 लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेले. दिपावलीच्या मुहू्र्तावर अपना ज्वेलर्सच्या मालकाने सोन्याचांदीचे दागिने विक्रीसाठी आणले होते. कापड दुकानांमध्येही रेडीमेड कपड्यांचा माल भरलेला होता. तर सद्गुरू मेडिकलमध्ये मोबाईल शॉपी आहे. त्यांनीही मोबाईल व इतर साहित्य ठेवले होते. परंतु कोणत्याही मोबाइलला चोरट्यांनी हात लावला नाही. 

हेही वाचा - माझ्या मृत्यूस हिच जबाबदार: मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून तरूणाने केली आत्महत्या -

घटनास्थळी पोलीसांनी तात्काळ दुकानांचे पंचनामे केले. चोरी झालेली वार्ता पसरल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांना पंचनामा करताना अडचण येत होती.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft in sangli area zare village one time three shops are shifted by a theft 10 lakh rupees in sangli