esakal | भात-आमटीच बरी, चपाती मात्र न खाल्लेलीच बारी... या रुग्णालयात आहे तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

There is a complaints about food in this Miraj Covid hospital

मिरजेतील कोरोना रुग्णालयात निकृष्ठ दर्जाचा अन्न पुरवठा होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

भात-आमटीच बरी, चपाती मात्र न खाल्लेलीच बारी... या रुग्णालयात आहे तक्रार

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज ः जागतिक पातळीवर आणि देशातही कोरोना हा प्रथम प्राधान्याचा विषय आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासन कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत आहे. असे असताना मिरजेतील कोरोना रुग्णालयात निकृष्ठ दर्जाचा अन्न पुरवठा होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णानेच त्याचा पंचनामा केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी अन्न पुरवठ्याबाबत तक्रारी असल्याचे मान्य करीत त्याबाबत तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. 

मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोरोना रुग्णालय जाहीर करण्यात आले. त्यानंतर येथे विशेष सुविधा पुरवल्या गेल्या. येथे विशेष दक्षता घेतली जात आहे. जिल्ह्यातील, कर्नाटकातील, कोल्हापूर सीमा भागातील रुग्णांवरही येथेच उपचार केले जात आहेत. परंतू, या रुग्णालयाच्या आतील चित्र धक्का देणारे ठरले. येथील रुग्णांना निकृष्ट आहार दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. रुग्णालयातील एका रुग्णांनेच त्याचा पंचनामा केला. त्याची व्हिडिओ क्‍लीप सर्वत्र फिरली. समाज माध्यमांवर त्याची चर्चा सुरु झाली. कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळेवर आणि सकस आहार देणे गरजेचे असताना ठेकेदाराच्या मनमानीमुळे रुग्णांना योग्य तो सकस आहार वेळेवर मिळत नसल्याची माहिती पुढे येत आहे. रुग्णांच्या तक्रारी आहेत. यामुळे काही रुग्णांनी नाष्टा आणि जेवणावर बहिष्कार घातल्याचेही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

मिरजेत सध्या सध्या या रुग्णालयात एकूण 222 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांना नाष्टा, चहा, जेवण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. रुग्णालय प्रशासनाने ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदाराकडून सकाळी अकरा वाजेपर्यंत नाश्‍ता दिला जात नाही. जेवणामध्ये दिल्या जाणाऱ्या चपात्या आणि अन्य पदार्थांचीही दर्जाही निकृष्ट असल्याच्या तक्रारी रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांकडे केल्या आहेत. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी घरचे अन्न त्या ठिकाणी घेऊन देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णास सकस आहार वेळेवर देण्यासाठीचे बंधन आहे. हे काम स्वीकारलेल्या ठेकेदाराकडून मात्र आवश्‍यक ती काळजी घेतली जात नाही. रुग्णालय प्रशासनही याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशीही रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी आहे. 

रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना सूचना दिल्या

मिरजेच्या कोरोना रुग्णालयात जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी असतील तर त्या दूर केल्या जातील. माझ्या कानावर काही गोष्टी आल्या आहेत. मी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना सूचना दिल्या आहेत. तत्काळ त्यात सुधारणा झालेल्या दिसतील.

- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी.