'शिवशाही' बरोबर साध्या बसचाही पर्याय 

संजय साळुंखे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

सातारा- पुणे विनाथांबासाठी "शिवशाही'चा तिकीट दर 65 रुपयांनी जास्त आहे. प्रवाशांचा जादा तिकीट दरामुळे या सेवेला विरोध आहे. त्यामुळे "शिवशाही'चा तिकीट दर कमी करण्याची प्रवाशांची मागणी वरिष्ठांना कळविण्यात येईल. 
विजय मोरे, विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा विभाग

सातारा ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सध्या "शिवशाही'च्याच नव्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल कराव्या लागत आहेत, तरीही प्रवाशांच्या मागणीनुसार सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा सेवेसाठी "शिवशाही'बरोबर साध्या बसचाही पर्याय देण्यात येईल. त्यानुसार त्यांना आपल्या पसंतीप्रमाणे कोणत्याही गाडीतून प्रवास करता येईल. लवकरच या दोन्ही सेवांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'ला दिली.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा- पुणे विनावाहक विनाथांबा सेवेचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या, तर साध्या बसच्या (लालपरी) 40 फेऱ्यांऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. साध्या बसच्या फेऱ्या कमी करून "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. "शिवशाही'तून प्रवास करताना साध्या बसपेक्षा 65 रुपये जादा द्यावे लागत असल्याने प्रवाशांतून या निर्णयाला विरोध होत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रवाशांनी या निर्णयाला विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याची दखल घेत सातारा विभागातील अधिकाऱ्यांकडूनही या सेवेत फेरबदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत विजय मोरे यांनी माहिती दिली.
 
आम्ही लढा उभारु ; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

महांडळाच्या सेवेत "शिवशाही'च्या 700 बस दाखल झाल्या आहेत. त्यातील काही बस सातारा विभागाला मिळाल्या आहेत, असे सांगून श्री. मोरे म्हणाले, ""पूर्वी खासगी ट्रॅव्हलच्या या बस होत्या. त्यातील बहुतांश बस बंद झाल्या आहेत. राहिलेल्या बस महिनाभरात बंद होतील. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या सेवेत महामंडळाच्याच "शिवशाही' असतील. या बससाठी प्रशिक्षित चालकांची गरज आहे. त्यादृष्टीने सातारा विभागातील चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.''
 
प्रवाशांना "शिवशाही' नको असेल...

बदलत्या काळानुसार प्रवाशांची प्रवास करण्याची पद्धतही बदलत आहे. आरामदायी प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे लक्षात घेऊनच महामंडळाने प्रवाशांना "शिवशाही'चा पर्याय देत आहे, असे नमूद करून श्री. मोरे म्हणाले, ""सातारा- पुणे विनाथांबा सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना साध्या बसबरोबर "शिवशाही' बसही देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना "शिवशाही' नको असेल, तर त्याचा विचार केला जाईल.

सातारा-पुणे विनाथांबासाठी सातारा बस स्थानकावर लवकरच दोन केबीन करण्यात येतील. त्या साध्या व "शिवशाही' बससाठी असतील. प्रवाशांनाही एकाच वेळी "शिवशाही' व साध्या बस उपलब्ध करून दिल्या जातील. त्यातून आपल्या पसंतीनुसार प्रवास करता येईल. येत्या महिनाभरात केबीनचे काम पूर्ण होईल. त्यानंतर नवीन वेळापत्रक तयार केले जाईल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Will Be Optional Bus Along With 'Shivshahi' Bus For Satara - Pune