गोकुळच्या आगामी निवडणूकीत 'हे' तिघे एकत्र येण्याची शक्यता

These Three Leaders Union In forthcoming Gokul Election
These Three Leaders Union In forthcoming Gokul Election

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हातात हात घालून केलेले काम आणि त्यामुळे आघाडीला मिळालेले यश आणि भविष्यातील जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा पाहता जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’मध्ये आमदार पी. एन. पाटील यांच्यासह हसन मुश्रीफ व सतेज पाटील एकत्र येण्याची शक्‍यता आहे. पी. एन. यांच्याकडेच संघाचे नेतृत्व देऊन माजी आमदार महादेवराव महाडिक यांना शह देण्याचा यातून प्रयत्न असेल.

विधानसभेच्या निकालानंतर तातडीने ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा रद्द झालेला निर्णय, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. मुश्रीफ यांनी पी. एन. यांच्याशी साधलेला संपर्क आणि विधानसभेच्या निवडणुकीत करवीर, दक्षिणमध्ये पी.एन-सतेज यांच्यात झालेले ‘अंडरस्टॅंडिंग’ पाहता ‘गोकुळ’ची आगामी निवडणूक हे तिघे एकत्र येऊन लढण्याची शक्‍यता आहे. त्यात तिघांनी एकत्र यावे, यासाठी संघातील काही ज्येष्ठ संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संचालकांचा यात पुढाकार आहे. यातून जिल्हा बॅंकेचे राजकारण श्री. मुश्रीफ यांनी, तर ‘गोकुळ’चे राजकारण पी. एन. यांच्याकडे देऊन जिल्ह्यातील इतर राजकारण सतेज पाटील यांच्याकडे जाण्याची शक्‍यता आहे.

वर्षभर ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा वाद सुरू आहे. तत्पूर्वीच, श्री. महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा वाद सुरूच होता. मल्टिस्टेटच्या निमित्ताने सत्ताधारी मंडळींनी श्री. पाटील यांच्या हातात आयतेच कोलीत दिले. श्री. पाटील यांनी याचा फायदा उठवत यानिमित्ताने श्री. महाडिक विरोधकांची मोट बांधण्यात यश मिळवले. त्याचा पहिला फटका लोकसभेला श्री. महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांना बसला.

निवडणुकीत दीपक पाटील वगळता एकाही संचालकांच्या गावात श्री. महाडिक यांना मताधिक्‍य नाही. विधानसभेच्या निवडणुकीत तर बहुतांशी संचालकांनी श्री. महाडिक यांनी सांगितलेल्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली. दुसरीकडे लोकसभेतील पराभव भरून काढताना आघाडीचे नेते म्हणून पी. एन., सतेज व मुश्रीफ यांनी चांगली मोट बांधून जिल्हा भाजपमुक्त केला आणि सेनेलाही शह दिला.

भविष्यातील ‘गोकुळ’ असो किंवा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवार ठरवण्यापासून ते विरोधात पॅनेल करण्यापासूनची सूत्रे या त्रिकुटांकडेच असतील. त्यात ‘गोकुळ’चे नेतृत्व पी. एन. यांच्याकडे सोपवून संघातील श्री. महाडिक यांच्या सत्तेला हादरा देण्याचा प्रयत्न असेल. तथापि, पी. एन.-महाडिक यांच्यातील मैत्री आणि ‘गोकुळ’मधील या दोघांचे नेतृत्व पाहता पी. एन. याला किती प्रतिसाद देणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

संचालकांची बदनामी

गोकुळ मल्टिस्टेट करण्यावरून नेत्यांबरोबरच सत्तारूढ संचालकांचीही बदनामी झाली आहे. संचालकांच्या यादीकडे नजर टाकली तर एक-दोन संचालक सोडले तर मतांचा गठ्ठा असलेला संचालक दिसत नाही. ज्यांच्याकडे मते आहेत, ते सत्ताधारी नेत्यांसोबत राहतील का नाही? हा उत्सुकतेचा विषय आहे.

संचालकांना एकत्र ठेवणे आव्हान

विद्यमान संचालक मंडळात पी. एन. यांना मानणारे सहा संचालक आहेत; तर श्री. महाडिक यांना मानणारे आठ संचालक आहेत. आमदार राजेश पाटील, विलास कांबळे हे राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते सांगतील त्या बाजूला असतील. अशा स्थितीत आहे त्या संचालकांना एकत्र ठेवणेही पी. एन.-महाडिक यांच्या दृष्टीने आव्हान असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com