अवयवदानासाठी त्यांनी केली 787 कि.मी.ची पदयात्रा

अजित कुलकर्णी
Thursday, 20 February 2020

मरावे परी अवयवरुपी उरावे हा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी समविचारी मित्रांनी नाशिक ते बेळगाव अशी पदयात्रा सुरू केली आहे. आता सहा जिल्हे ओलांडून ही पदयात्रा सांगलीतून कर्नाटकच्या दिशेने रवाना झाली.

सांगली, ता. 19 : मरावे परी अवयवरुपी उरावे हा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी समविचारी मित्रांनी नाशिक ते बेळगाव अशी पदयात्रा सुरू केली आहे. आता सहा जिल्हे ओलांडून ही पदयात्रा सांगलीतून कर्नाटकच्या दिशेने रवाना झाली. येत्या शनिवार (ता. 22) या 787 किलोमीटर अंतराच्या या पदयात्रेचा बेळगावमध्ये समारोप होईल.

उद्योजक सुनील देशपांडे, निवृत्त नौसैनिक वसंतराव चिकोडे, खासगी नोकरी करणारे रवींद्र दरेकर (सर्व नाशिक), निवृत्त बॅंक अधिकारी शशांक तारे, अभियंते चंद्रशेखर देशपांडे (नवी मुंबई) या समविचारी मित्रांनी "फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन' नावाने संस्था स्थापन केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम पवार (वसई) काम पाहतात. त्यांच्यासोबत ऐरोलीचे सुधीर बागाईतकरही सहभागी असून ते पुढे जाऊन शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना भेटून वेळा निश्‍चित करतात.

या संस्थेच्यावतीने नव्या वर्षात त्यांनी ही पदयात्रा सुरू केली आहे. संस्थेच्यावतीने अवयवदान मोहिमेसाठी अशा 3 पदयात्रा पूर्ण केल्या आहेत. तब्बल 2790 किलोमीटर अंतर पार केले आहे. गेल्या 1 जानेवारीला पदयात्रेचा चौथा टप्पा सुरू झाला.

नाशकातील कविवर्य कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ही पदयात्रा सुरू झाली. गोवा ते गोंदिया व कोल्हापूर ते डांग असा सबंध महाराष्ट्र त्यांनी या मोहिमेच्या प्रचार-प्रसारासाठी पायी तुडवला आहे. वाटेत ते भेटले त्याला या आपल्या चळवळीचे महत्त्व सांगतात. शंका निरसन करतात. त्यासाठी ते शाळा-महाविद्यालयात जातात. हा जागर करीतच ते पुढे जातात. दररोज किमान 20 किलोमीटर अंतर ते चालतात.

श्री देशपांडे म्हणाले,""मृतदेहाचे दहन किंवा दफन करण्याऐवजी ते दान केल्यास 50 रुग्णांना विविध प्रकारे नवजीवन मिळू शकते. धार्मिक, सामाजिक व अंधश्रद्धांच्या पगड्यातून समाजाने आता बाहेर पडले पाहिजे. 1994 मध्ये अवयवदानाचा कायदा झाला. अवयवदानातील व्यापारीकरण रोखण्यासाठी यात वेळोवेळी बदल झाले. डोळे व किडनी दानापुरतीच लोकांना माहिती आहे. मात्र नैसर्गिक मृत्यूनंतर त्वचा, हाडे, कूर्चा, रक्‍तवाहिन्या, कानाची हाडे याचे प्रत्यारोपण करता येते. मात्र ब्रेनडेड झाल्यावर या अवयवांशिवाय मूत्रपिंड, यकृत, फुप्फुसे, आतडे, हृदय, स्वादुपिंड, स्वरयंत्र याचे प्रत्यारोपण आधुनिक तंत्राने शक्‍य झाले आहे. तर जिवंत दात्याच्या शरीरातून रक्‍त, अस्थिमज्जा, एक किडनी तसेच यकृत, फुप्फुसे, आतडे, स्वादुपिंडाचा काही भाग प्रत्यारोपण करता येतो.'' 

मेसेजपासून सावध रहा 
श्री. देशपांडे म्हणाले,""अलीकडे अनेकदा समाजमाध्यमावर मेसेज येतात. त्यात रुग्ण अत्यंत आजारी असून त्याचे डोळे, हृदय, मेंदू दान करावयाचा आहे. गरजवंतांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले जाते. त्यापासून सावधान रहा. अवयवदानाची ठरावीक पद्धत असते. इच्छापत्र, नातेवाईकांचे संमतिपत्र गरजेचे असते. नैसर्गिक मृत्यूनंतर 6 तासांच्या आत या अवयवदानाच्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: they made the 787-km trek to the organ Donation