esakal | बेळगाव : शहरात हातोहात दागिने लांबवनाऱ्या चोरांचा सुळसुळाट
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बेळगाव : शहरात हातोहात दागिने लांबवनाऱ्या चोरांचा सुळसुळाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : हातोहात दागिने आणि पैसे लांबविनाऱ्या भामट्या महिलांनी शहरात अक्षरश धुडगूस घातला आहे. दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्याच्या एका महिलेच्या पिशवीतील दोन लाख रुपयांची रोकड गणपत गल्लीत पळविण्यात आली आहे. तर मंगळसूत्र दुरुस्तीसाठी आलेल्या अन्य एका महिलेच्या पर्समधील दोन तोळ्याचे मंगळसूत्र मारुती गल्लीत लंपास करण्यात आले आहे. या दोन्ही घटना गुरुवार (ता. २) भर दिवसा घडल्या असून दोन्ही प्रकरणांची नोंद खडेबाजार पोलिस ठाण्यात झाली आहे.

सुरेखा मल्लाप्पा कुंभा गौडर (वय ४४, रा. मंगाईनगर तिसरा क्रॉस वडगाव) यांनी दोन लाख रुपये चोरी झाल्याप्रकरणी तर मनीषा विनायक नावेकर (रा. गणपत गल्ली मच्छे) यांनी मंगळसूत्र चोरी झाल्याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. सुरेखा या गुरुवारी दागिने खरेदी करण्यासाठी पिशवीतून दोन लाख रुपये घेऊन खडेबाजार रोडवरील पोद्दार ज्वेलर्सकडे येण्यासाठी निघाल्या होत्या. वडगाव बस मधून त्या यंदेकूट येथे उतरून चालत पोद्दार ज्वेलर्सकडे आल्या.

मात्र, दुकानात गर्दी असल्याचे पाहून त्या गणपत गल्ली येथील एका सोन्याच्या दुकानात गेल्या. त्या ठिकाणी चांदीचे दागिने खरेदी करून पुन्हा गणपत गल्ली येथील कार्तिका दुकानासमोर भांडी पाहत थांबल्या होत्या. त्यानंतर पोतदारर ज्वेलर्स मधील गर्दी कमी झाली असावी, या शक्यतेने त्या चालत पोद्दार ज्वेलर्स मध्ये आल्या. दुकानात आल्यानंतर पिशवीतील सुमारे दोन लाख रुपये गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी आज खडेबाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुसऱ्या घटनेत मनीषा देखील त्याच दिवशी आपल्या बहिणी सोबत आपले मंगळसूत्र दुरुस्त करून घेण्यासाठी पांगुळ गल्ली येथे आल्या होत्या. दोन तोळ्याचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र दुरुस्ती करून घेऊन त्यानी ते आपल्या गळ्यात घालण्याची पुन्हा पर्समध्ये ठेवून ती पर्स पिशवीत ठेवली. त्यानंतर दोघेही मारुती गल्ली येथील सत्कार हॉटेल समोर भाजी खरेदी करण्यासाठी आल्या. हातातील पिशवी खाली ठेवून भाजी खरेदी करत असताना पर्समधील मंगळसूत्र गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी देखील आज या प्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

एकाच दिवशी भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर पुढील तपास करीत आहेत. सुरेखा यांच्या पिशवीतील दोन लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोन भामट्या महिला व एक तरुण तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी त्याद्वारे तपास हाती घेतला आहे.

loading image
go to top