हजारो विद्यार्थ्यांनी घेतली प्लास्टिक मुक्तीची शपथ; 'सकाळ'तर्फे एसव्हीसीएस प्रशालेत जागर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचा ध्वज वापरणार नाही.. अशी प्लास्टिक मुक्तीची शपथ 'सकाळ'च्यावतीने एसव्हीसीएस प्रशालेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. 

सोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन..' स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचा ध्वज वापरणार नाही.. अशी प्लास्टिक मुक्तीची शपथ 'सकाळ'च्यावतीने एसव्हीसीएस प्रशालेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. 

मंगळवारी दुपारी अक्कलकोट रस्त्यावरील एसव्हीसीएस प्रशालेच्या मैदानावर हजारो विद्यार्थ्यांनी प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली. 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुक्तीची शपथ दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्लास्टिक बंदी आणि कारवाईच्या अनुषंगाने त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी महापालिकेचे अन्न परवाना निरीक्षक सूर्यकांत लोखंडे, एसव्हीसीएस प्रशालेचे उपमुख्याध्यापक नंदकुमार धाये, पर्यवेक्षक विलास म्हमाणे, एस. आर. व्हनमाने, प्रवीण कुंभार, एम. एम. कोरे, श्रीकांत धनवे आदी उपस्थित होते. 
 


महाराष्ट्र शासनाने 23 मार्च 2018 रोजी अध्यादेश काढून प्लास्टिकवर बंदी आणली आहे. विद्यार्थ्यांनी कुटुंबातील सदस्यांना, शेजाऱ्यांना प्लास्टिक बंदीविषयी, प्लास्टिक न वापरण्याविषयी सांगावे. प्लास्टिकच्या कॅरिबॅग वापरणे बंद करून कापडी पिशवी वापरण्यास सुरवात करावी. तसेच स्वातंत्र्य दिनी प्लास्टिकचे ध्वज वापरू नयेत. 'सकाळ' आधीपासून प्लास्टिकसह प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्नशील आहे
- नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 

महापालिकेच्यावतीने प्लास्टिक बंदीच्या आदेशानंतर कारवाईसोबतच प्रबोधनही करण्यात येत आहे. सोलापूरकरांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'च्या माध्यमातून एसव्हीसीएस प्रशालेतील हजारो विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्तीची शपथ देण्यात आली. या उपक्रमातून नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतील. 
- सूर्यकांत लोखंडे, अन्नपरवाना निरीक्षक, महापालिका

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of students took pledge of plastic release at Solapur