तीन महिने पुरेल इतका धान्यसाठा : डॉ. विश्‍वजीत कदम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

राज्यात तीन महिने पुरेल इतका धान्यसाठा आहे. नागरिकांनी साठा करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

सांगली : राज्यात तीन महिने पुरेल इतका धान्यसाठा आहे. नागरिकांनी साठा करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

"कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रशासकीय उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले,"" सध्याची स्थिती तात्पुरती आहे. काही दिवसच नागरिकांनी त्रास सहन करावा. धान्याचा साठा करु नये. पुरेसा धान्यसाठा आहे. आरोग्याच्या दृष्टीने शासनाने काही निर्णय घेतलेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. द्राक्ष, फळे, भाजीपाला यांच्या बाबतीत अत्यावश्‍यक सेवांत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. वाहतूक सुरळीत सुरू राहील याबाबत प्रशासन सर्वोपरी काळजी घेत आहे. धान्य वाटप लवकरच सुरळीत सुरू होईल. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. आरोग्य, पोलीस, जिल्हा प्रशासन यंत्रणा सर्वजण बिकट परिस्थितीत झोकून देवून काम करीत आहेत. नागरिकांनी प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या आदेशांची पायमल्ली करू नये. घराबाहेर पडू नये. शेतमालाच्या वाहतूकीत अडथळा होऊ नये यासाठी राज्य व केंद्राने स्पष्ट निर्देश दिलेत. प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे. तहसिलस्तरावर कृषि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना पास देण्याची व्यवस्था केली जात आहे.'' 

ते म्हणाले,""मास्क, सॅनिटायझर, जीवनावश्‍यक वस्तूंची जास्त किंमतीने विक्री करू नये. तसे आढळले तर त्याच्यावर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल. खासगी डॉक्‍टर्सनी हॉस्पीटल, दवाखाने लोकांसाठी उघडीच ठेवावेत. भारती हॉस्पीटलकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्‍यक यंत्रणा, मनुष्यबळ, निधी याबाबत सर्वोपरी मदत करण्यात येईल.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three months ration is in stores : Dr, Kadam