बेळगावातील तीन जण अपघातात जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

बेळगावातील तीन जण अपघातात जागीच ठार

बेळगाव - भरधाव मोटारीची रस्त्याकडेच्या झाडाला जोरदार धडक बसल्याने गोव्यात झालेल्या भीषण अपघातात बेळगावातील तीन युवक जागीच ठार झाले; तर एकजण गंभीर जखमी झाला. आज पहाटे चारच्या सुमारास शिओली-म्हापसा मुख्य रस्त्यावरील कुचेलीनजीक हा अपघात झाला.

नायर हसनसाब अनगोळकर (वय २८, रा. प्लॉट नं. ३२, श्री महालसा नववा क्रॉस, भाग्यनगर), रोहन महादेव गडाद (२६, रा. रामदेव गल्ली वडगाव) आणि सनी परसाप्पा अनवेकर (३१, रा. गणेशपूर) अशी मृतांची नावे असून, विशाल विलास कारेकर (२७, रा. दत्त गल्ली) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत म्हापसा पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, बेळगावातील हे चारही जिवलग मित्र शनिवारी रात्री स्विफ्ट मोटारी (केए २२ एमए ९८१३ ) तून पर्यटनासाठी गोव्याला जाण्यासाठी निघाले होते. नायर हा मोटार चालवत होता. ते शिओली म्हापसा मुख्य रस्त्यावरील कचेलीनजीक आले असताना चालक नायरला डुलकी आली. त्यामुळे त्याचा मोटारीवरील ताबा सुटून मोटार रस्त्याकडेच्या झाडाला जाऊन आदळली. या भीषण अपघातात कारमधील तिघे जण जागीच ठार झाले. तर विशाल गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. पहाटे चारच्या दरम्यान घडलेल्या अपघाताची माहिती समजताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला गोमेकॉत रुग्णालयात हलविले. चालकाच्या खिशात आढळून आलेल्या वाहन परवान्यावरून सर्वजण बेळगावचे असल्याची खात्री पटली. त्यानंतर संबंधितांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना गोव्याला पाचारण करण्यात आले. मोटारचालक नायर हा श्री महालसा नववा क्रॉस भाग्यनगर बेळगाव येथील असल्याचे स्पष्ट झाले.

मात्र, अन्य दोघा मृतांचे आणि जखमीचा मूळ पत्ता मिळविण्यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत शल्यचिकित्सा करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांवर गोव्याचे दर्शन होण्यापूर्वीच काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

वीकेंडला बाहेर जाण्याची आवड

चालक नायर हा भाग्यनगरला राहत असला, तरी तो कामानिमित्त दुबईला असतो. बेळगावला आल्यावर तो कायम आपल्या मित्रांना बाहेर फिरावयासाठी नेत होता. त्याची आलिशान बीएमडब्ल्यू मोटार असून, त्यांनी शनिवारी रात्री गोव्याला जाण्यासाठी दुसऱ्याची स्विफ्ट गाडी घेतली होती. या चौघा मित्रांना वीकेंडला बाहेर फिरावयास जाण्याची आवड होती. वीकेंड साजरा करण्यासाठी गोव्याला जात असतानाच ही दुर्घटना घडली.

Web Title: Three Persons Killed On The Spot In Accident Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top