जतमध्ये तीन रुपयाला एक घागर 

प्रदीप कुलकर्णी
रविवार, 7 एप्रिल 2019

एक नजर

  • जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यलम्मा विहिरीची योजना पाण्याअभावी बंद
  • ऐन उन्हाळ्यात शहरात जलसंकट
  • आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा
  • नागरिकांना विकतच्या पाण्याचा आधार
  • खासगी टॅंकरवाल्याची चलती
  • तीन रुपयाला एक घागर असा दर 

जत - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यलम्मा विहिरीची योजना पाण्याअभावी बंद पडल्याने ऐन उन्हाळ्यात शहरात जलसंकट ठाकले आहे. पाणीपुरवठा करताना पालिकेला कसरत करावी लागत असून आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांना विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे खासगी टॅंकरवाल्याची चलती आहे. तीन रुपयाला एक घागर असा दर सुरू आहे.

६५ हजारांच्या घरात असलेल्या लोकसंख्येला यलम्मा विहीर व बिरनाळ तलावातून पाणीपुरवठा होतो. जवळपास ४० टक्के लोकसंख्येला यलम्मा, तर ६० टक्के लोकांना बिरनाळ तलावातून पाणीपुरवठा केला जातो. यलम्मा विहिरींची योजना पाण्याअभावी बंद पडली आहे. त्यामुळे शहरात जलसंकट उभे टाकले आहे. संपूर्ण शहराला बिरनाळ तलावातून पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला कसरत करावी लागत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. 

विकतच्या पाण्याचा आधार 
आठवड्यातून एकदा पाणी येत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पाणी पुरत नसल्याने नागरिकांना विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे खासगी टॅंकरवाल्याची चलती सुरू असून घागरीला तीन रुपये मोजावे लागतात. हॉटेल्स, खानावळ, धाबे, चहा टपऱ्या, चायनीज, भेळ आधी व्यावसायिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने पदार्थाचे दरही वाढविण्यात आले आहेत. याशिवाय १२ शुद्धजल केंद्रे आहेत. येथे साधे पाणी १ रुपये, तर थंड पाणी २ रुपये लिटर प्रमाणे मिळते. पिण्याच्या पाण्यासाठी याच पाण्याचा वापर केला जात असल्याने शुद्धजल केंद्रावर गर्दी होत आहे. घरपोच सेवेला जास्त पैसे मोजावे लागतात.

कालबाह्य पाईपलाईन प्रारंभी संपूर्ण शहराला यलम्मा विहिरीतून पाणीपुरवठा होत होता. १९८० साली बिरनाळ पाणी योजनेने जन्म घेतला. २५ हजार लोकसंख्या गृहीत धरून त्यावेळी योजना राबविण्यात आली. आज लोकसंख्या ६५ हजारांच्या घरात गेली आहे. मात्र या ३९ वर्षांत नवी कोणतीही योजना राबविण्यात आली नाही.

जुन्या मुख्य पाईपलाईनला उपपाईपलाईन जोडून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे क्षमतेपक्षा जास्त नळ कनेक्‍शन झाले आहेत. हे करत असताना पाणी मुबलक आणि दाबाने मिळते की नाही याचा विचार झाला नाही. सध्याची पाईपलाईन कालबाह्य झाली आहे. ठिकठिकाणी पाईप फुटल्या आहेत, गळती निर्माण झाली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. 

नवी योजना करण्याची मागणी
शहराला जास्त दाबाने व दररोज पाणी मिळावे, यासाठी नवी योजना करण्याची गरज आहे. पालिका स्थापन झाल्यानंतर तत्कालीन नगरसेवक मोहन ऊर्फ भैया कुलकर्णी व उमेश सावंत यांनी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव करण्याचा ठराव केला. त्यानंतर प्रस्तावही तयार करण्यात आला. मात्र, ताकदीने पाठपुरावा न झाल्याने प्रस्ताव पडून आहे.

Web Title: Three Rupees for one Ghagar water in Jat Sangli

टॅग्स