
कुंडल फाटा येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले. वाळू वाहतूकविरोधी पथकाने काल (ता. 7) मध्यरात्री ही कारवाई केली.
पलूस (जि. सांगली) ः कुंडल फाटा येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले. वाळू वाहतूकविरोधी पथकाने काल (ता. 7) मध्यरात्री ही कारवाई केली. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर, दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी सांगितले.
तालुक्यात बाहेरच्या जिल्हे व तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक करून वाळू आणली जाते. काही ठिकाणी वाळूचे साठेही केले जातात. बांधकामासाठी सोन्याच्या भावाने वाळू विकली जाते. या वाळू वाहतूक तस्करांची मोठी साखळी कार्यरत आहे. 1 जानेवारीपासून त्यांनी वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध पथकच तयार करून कारवाई सुरू केली आहे.
तहसीलदार ढाणे यांच्या नेतृत्वाखाली काल (ता. 7) मध्यरात्री मंडल अधिकारी ए. डी. लोहार (भिलवडी), तलाठी बाबूराव जाधव (पलूस) व तलाठी सचिन कांबळे (नागराळे) यांच्या पथकाने कुंडल फाटा येथे विटा येथून इस्लामपूरच्या दिशेने निघालेले वाळूचे तीन ट्रक पकडले. घटनास्थळी पंचनामे करण्यात आले. ट्रक तहसीलदारांनी ताब्यात घेतले आहेत.
तिन्ही वाहनांचे वाहनचालक सदर ट्रकमालकांची नावे सांगत नाहीत. त्यामुळे आता परिवहन कार्यालयाकडून ट्रकच्या नंबरवरून नावे घेण्यात येतील व कायदेशीर, दंडात्मक कारवाई केली जाईल, असे ढाणे यांनी सांगितले.
लाखो रुपयांचा दंड
सदर तिन्ही वाहनांमध्ये अंदाजे तीन ते चार ब्रास वाळू आहे. एका ब्राससाठी जवळजवळ 35 हजारांचा दंड होईल, अशा तिन्ही वाहनांतील वाळूचा हिशेब केल्यास एकूण सहा ते सात लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.
संपादन : युवराज यादव