सांगलीत तीन गावे आणि शंभरांहून अधिक गल्ल्यांना मिळणार नवी नावे ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

ही प्रक्रिया करताना  गावकऱ्यांना विश्‍वासात घेतले जाईल, असे सांगण्यात आले.

सांगली : राज्य सरकारने राज्यातील जातिवाचक उल्लेख असलेल्या गावे, वाड्यावस्त्या, गल्ल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आणलेल्या या प्रस्तावाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील तीनही पक्षनेत्यांनी स्वागत केले. त्यानुसार जिल्ह्यातील किमान तीन गावे आणि शंभरांहून अधिक गल्ल्यांची नावे बदलली जाऊ शकतात. त्याबाबतचा अध्यादेश जारी झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया करताना  गावकऱ्यांना विश्‍वासात घेतले जाईल, असे सांगण्यात आले.

राज्याच्या मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर ‘सकाळ’ने जिल्ह्यातील ७०४ गावांची नावे चाळली. त्यात ४५ गावांची नावे ही आडनावावरून पडलेली आहेत. एका विशिष्ट आडनावाची लोकवस्ती अधिक असल्याने ती नावे मिळाली असावीत. हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्‍या गावांना महापुरुषांची नावे आहेत. तीन गावांच्या नावात थेट जातीचा उल्लेख आहे. राज्य शासनाने हा निर्णय घेताना कुठल्याही प्रकारे जातिवाचक उल्लेखाने कुणाला कमी किंवा अधिक लेखले जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

हेही वाचा -  अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हातात वही ऐवजी आता स्मार्टफोन -

जिल्ह्यातील नावांच्या बदलाबाबत जेव्हा प्रत्यक्षात चर्चा सुरू होईल, तेव्हा याला स्थानिक नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय, याकडे लक्ष असेल. या गावांना, गल्ल्यांना महापुरुषांची नावे द्यावीत, असे अपेक्षित आहे. उदा. शिवाजीनगर, भीमनगर, क्रांतीनगर, जोतीनगर आदी असू शकतील. राज्याच्या नगरविकास आणि ग्रामविकास विभागांनी यावर तातडीने कार्यवाही करावी, असे मंत्रिमंडळाने स्पष्ट केले आहे. 

 

काही आधीच बदललेली नावे 

खरकटवाडी या नावाने ‘कांचनपूर’ नाव करून घेतले. मुलाणवाडीचे ‘रामनगर’ झाले; तर भाकुचीवाडी परिसराचे नाव आता ‘भाग्यनगर’ आहे. बुधगाव येथे एका वस्तीला वनवासवाडी नाव होते, त्याचे नाव आता ‘शिवाजीनगर’ झाले आहे. तावडरवाडीचे ‘धनगाव’ झाले. त्याला अधिकृत मान्यताही मिळाली. याआधी काही गावांनी आपल्या गावासमोरील ‘वाडी’ हटवण्यासाठी गावांचे नाव बदलून घेतले. मुलांचे लग्न जुळवताना ‘वाडी’ अडचणीची ठरत असल्याने तो प्रयोग करण्यात आला होता.

ही असतील संभाव्य गावे

तासगाव तालुक्‍यातील वंजारवाडी गावाचे नाव वंजारी समाजाची वस्ती अधिक असल्याने पडले आहे. जत तालुक्‍यात लमाणतांडा या छोट्या वस्तीवजा गावात लमाण समाजाची संख्या अधिक असल्याने त्याला ते नाव मिळाले. वाळवा तालुक्‍यात बेरडमाची गावाचे नावही जातिवाचक आहे. त्यामुळे या ती गावांच्या नावांमध्ये बदलाबाबत प्रस्ताव समोर येऊ शकतो. अर्थात, त्याला गावाची मान्यता, घ्यावी लागेल का, त्या गावातील लोकभावना काय आहे, याबाबत अध्यादेश आल्यानंतर स्पष्टता येईल.

हेही वाचा - रात्रीचा थरार ; बिबट्याच्या रूपात साक्षात मृत्यूच समोर उभा ; तरुणाची चलाखीने सुटका

 

शहरातील गल्ल्यांची नावे

सांगली शहरात धनगर गल्ली, गोसावी गल्ली, वडर कॉलनी, माळी गल्ली, भोई गल्ली, हिंदू-मुस्लिम चौक, मिरजेतील ब्राह्मणपुरी आदी नावे जातिवाचक आहेत. दुसरीकडे काही नावे आदर्श आहेत. त्यात अहिल्यादेवी होळकर चौक, कर्मवीर चौक, मित्रमंडळ चौक, दसरा चौक, राजर्षी शाहू महाराज चौक, शहीद अशोक कामटे चौक, फौजदार गल्ली, एकता चौक आदी नावे लक्षवेधी आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three village 100 lane change name in sangli permission of villagers