
बेळगाव : चार लाखांचा ऐवज पळविणाऱ्या तीन चोरट्या महिलांना अटक
बेळगाव - बंद घराचा दरवाजा उघडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या तीन महिलांना अटक केली. लक्ष्मी दुर्गापा रुद्राक्षी (वय २८), समम्म विजय टेकून (२२, दोघेही रा. सागरनगर, कलखांब), कुला दुर्गापा रुदराक्षी (वय २०, रा. जनता प्लॉट, वंटमुरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. बसवान गल्ली शहापूर येथे सोमवारी (ता. २५) सायंकाळी चोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होती.
चोरी प्रकरणी वर्षा महेश बराले (रा. रेल्वे स्थानकानजिक) यांनी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली होती. वर्षा यांची आई बसवाण गल्ली शहापूर येथे राहतात. त्या घराला कुलूप घालून रविवारी (ता. २४) पुण्याला गेल्या होत्या. चोरट्यांनी याच संधीचा फायदा उठवत घरच्या मागचा दरवाजा फोडून दुसऱ्या मजल्यावर प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून त्यातील दहा ग्रॅम सोन्याचे दागिने, चार किलो चांदी, तांब्याचे दोन हंडे आणि एक लाख ५० हजारांची रोकड घेऊन पलायन केले. वर्षा यांच्या आई पुण्याहून आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.