राष्ट्रीय महामार्ग चारवरील टोलनाके टोल फ्री 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

निपाणी ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्यावतीने कोगनोळी टोल नाक्यावर पोलिस तैनात केले आहेत. गेल्या चार दिवसापासून राष्ट्रीय महामार्गावर वाहने तुरळक झाली आहेत. 

कोगनोळी (बेळगाव) :  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणारे कोगनोळी हत्तरगी व  हिरे बागेवाडी  येथील टोलनाके  गुरुवारी ( ता. 26 ) टोल फ्री करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांच्या सोयीसाठी केंद्र शासन  व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

सध्या टोल नाक्यांवर तुरळक वाहने येत आहेत. निपाणी ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्यावतीने कोगनोळी टोल नाक्यावर पोलिस तैनात केले आहेत. गेल्या चार दिवसापासून राष्ट्रीय महामार्गावर वाहने तुरळक झाली आहेत. 

कर्नाटकात जीवनावश्यक वस्तूचे ट्रक व अन्य वाहने सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रातून येणारी चार चाकी वाहने व अन्य वाहने बंद करण्यात आली आहेत. या ठिकाणाहून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. सर्व गावामध्ये गावकऱ्यांनी रस्ते बंद केल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर गावात येणाऱ्या रस्त्यावर ट्रॉली लावून रस्ता बंद केल्याने नागरिकांना व अन्य महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या लोकांना बिरदेव माळमार्गे टोल नाक्यावरून कागलला जावे लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: toll free on National Highway four