

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील पहिला टोल नाका आज सुरू झाला. बोरगाव हद्दीत हा नाका असून बुधवारी मध्यरात्री पहिली पावती फाडली गेली. कोणतेही नोटिफिकेशन न काढता, महत्त्वाच्या मुद्यांचा खुलासा न करता ही वसुली सुरू झाल्याने वाहतूकदारांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. रत्नागिरी-नागपूर हा १६६ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि मिरज या दोन तालुक्यांतून गेला आहे. काही उड्डाणपुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. तानंग फाटा ते धामणी इथेपर्यंत रस्ता अजून सुरू व्हायचा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मिरज शहरावरील वाहतूक ताण कमी होणारआहे. एरवी मिरज ते सोलापूर अंतर पार करायला सरासरी चार तास लागत होते. आता अडीच ते पावणेतीन तासांत हे अंतर पार होते. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आदी धार्मिक पर्यटन केंद्रांशी, तसेच द्राक्ष नगरीला बेदाणा झोनशी जोडणारा हा मार्ग आहे.
आजपासून टोल आकारणी सुरू झाली असून कार, जीप, प्रवासी व्हॅन, हलके मोटार यांसाठी एकेरी फेरीसाठी ६५ रुपये टोल आहे. परतीच्या प्रवासासह १०० रुपये, मासिक पास (५० फेऱ्या) वैधता २२४० रुपये, जिल्हा अंतर्गत मुद्रांकित वाणिज्य वाहनासाठी ३५ रुपये, हलके वाणिज्य वाहन, हलके मालवाहू वाहन, मिनी बस प्रत्येक फेरीसाठी ११० रुपये, परतीच्या प्रवासासह १६५ रुपये, मासिक पास शुल्क ३६१५ रुपये असेल. ट्रक, बस (२ आस) वाहनाच्या प्रत्येक फेरीसाठी २२५ रुपये, परतीच्या प्रवासासह ३४० रुपये, मासिक पास शुल्क ७ हजार ५७५ रुपये, असा शुल्क आहे. वाणिज्य वाहनासाठी ११५ रुपये, व्यावसायिक वाहन (३-आस) प्रत्येक फेरीसाठी २५० रुपये, परतीसह ३७० रुपये आणि मासिक पास शुल्क ८ हजार २६५ रुपये आहे. खोदकाम करणारी उपकरणे, जड व्यावसायिक मशिन वाहनाच्या प्रत्येक फेरीसाठी ३५५ रुपये, परतीच्या प्रवासासह ५३५ रुपये, मासिक पास शुल्क ११ हजार ८८० रुपये शुल्क आहे.
अवजड वाहने (सात व त्यापेक्षा जास्त आस असणारी) वाहनाच्या प्रत्येक फेरीसाठी ४३५ रुपये, परतीच्या प्रवासासह ६५० रुपये, मासिक शुल्क १४ हजार ४६५ रुपये, जिल्हा अंतर्गत मुद्रांकित वाणिज्य वाहनासाठी २१५ रुपये, पथकर नाक्यापासून २० किलोमीटर परिसरामध्ये राहणाऱ्या स्थानिक बिगर व्यावसायिक वाहनाकरिता मासिक पास ३१५ रुपये असणार आहे. बोरगाव येथील टोलनाक्यावर पथकर आकारण्यात आला आहे.
काम अपूर्ण, तरी टोल का?
नागजपासून ते तानंग (ता. मिरज)पर्यंत काही शेतकऱ्यांना अद्याप रक्कम मिळाली नाही. तानंग फाटा ते धामणी येथील रस्त्याचे अद्याप काम अपुरे आहे. त्यामुळे टोलची घाई झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. या रस्त्यासाठी जमिनी अधिगृहित करण्यात आल्या आहेत. त्यातील काहींना अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्याबाबत तत्काळ निर्णय व्हावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. वाहनांवर जास्त प्रमाणात पथकर शुल्क आकारण्यात आल्याची टीका काहींनी केली आहे.
आधी खुलासे करा
वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील म्हणाले, ‘‘टोल वसुली सुरू करण्याआधी नोटिफिकेशन काढणे गरजेचे होते. टोलची आकारणी कशी होणार, स्थानिक वाहनधारकांना पासची आकारणी कशी असेल, पास नसेल, पण ते स्थानिक असतील, तर त्याची आकारणी किती, याबाबत पूर्ण खुलासा अपेक्षित होता. तसे न करताच घाई केलेली दिसते आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ ठेकेदार कंपनीला नोटीस बजावून आधी सगळे मुद्दे स्पष्ट करून घेतले पाहिजेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.