ते चीनमधून परतले, अन इकडे आरोग्य विभागाचे आरोग्य बिघडले

A total of 27 people returned from China
A total of 27 people returned from China

नगर ः चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे सगळे जगच धास्तावले आहे. नगरमधील एक नव्हे तर तब्बल २७जण चीनमध्ये होते. ते आता भारतात परतल्याने सगळ्यांचेच धाबे दणाणले आहे. ते नगरमध्ये येताच आरोग्य विभागाचेच आरोग्य बिघडले आहे. त्यांच्या शोधासाठी पथके फिरत आहेत. त्यांना या रोगाची लागण झाली की कशी याची खातरजमा करीत आहेत.

सुपे (ता. पारनेर) एमआयडीसीतील एका कंपनीतील एकूण 27 कामगार प्रशिक्षणासाठी चीनमध्ये गेले होते. ते नुकतेच परतले आहेत.

चौघांची आरोग्य तपासणी

त्यांची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला समजल्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीत जाऊन सर्वांची माहिती घेतली. त्यांतील एकाची काल (सोमवारी) व चौघांची आरोग्य तपासणी आज केली. त्यांची प्रकृती सामान्य असून, उर्वरित कामगारांची माहिती घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. 
चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून, त्याचा प्रादुर्भाव जगातील सुमारे अठरा ते वीस देशांमध्ये झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.

बाबुर्डी बेंदचा रहिवासी परतला

भारतातही केरळमध्ये तीन रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चीनमधून भारतात आलेल्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. सुपे एमआयडीसीतील कंपनीतर्फे बाबुर्डी बेंद येथील एक तरुण 11 डिसेंबर रोजी चीनमध्ये गेला होता. तो 18 जानेवारीला गावी परतला. त्याने स्वतः जिल्हा रुग्णालयात येऊन ही माहिती दिल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोग्य पथकाने पुन्हा त्याच्या घरी जाऊन त्याची तपासणी केली.

एकाला आहे सर्दी पडसे

त्या वेळी त्याने, आपल्याबरोबर कंपनीतील इतर सहकारीही प्रशिक्षणासाठी चीनला होते, अशी माहिती दिली. त्यामुळे आरोग्य पथकाने संबंधित कंपनीशी संपर्क साधून माहिती घेतली असता, एकूण 27 जण चीनला गेल्याचे आणि ते टप्प्याटप्प्याने परतल्याचे समजले. त्यांतील चार जणांची तपासणी आरोग्य पथकाने कंपनीमध्येच केली. सर्दीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना आज जिल्हा रुग्णालयात आणून तपासणी करण्यात आली. त्यांतील एकाला सर्दी असून, दोघांचे डोके दुखत होते. औषधोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. तसा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आला आहे.

27 जण चीनला गेले होते

चीनमधून परतून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला असला, तरी खबरदारी म्हणून त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
सुपे एमआयडीसीतील त्या कंपनीतील एकूण 27 जण चीनला प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यांतील काही जण नगर जिल्ह्यातील, तर काही अन्य जिल्ह्यांतील आहेत. त्यांतील एकूण पाच जणांची तपासणी झाली आहे. उर्वरित कामगार कंपनीत नसल्याने त्यांची तपासणी होणे बाकी आहे. 

त्यांनी चौदा दिवस अॅडमीट व्हावे
चीनमधील वुहान शहरातून कोणी आलेले असेल तर त्याला चौदा दिवस ऍडमिट करून औषधोपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, चीनमधील इतर शहरांतून आलेल्यांची तपासणी करण्याचे सूचित केलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यात कामकाज सुरू आहे. त्या कंपनीतील एकाची प्रथम रुईछत्तिशी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तपासणी झाली आहे. एकूण पाच जणांच्या तपासण्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. उर्वरितांना तपासणीसाठी बोलाविले आहे. - - डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com