esakal | याल तर हसाल न याल तर फसाल! टुरिंग टॉकीजची टूर टूर पडद्याआड

बोलून बातमी शोधा

null

याल तर हसाल न याल तर फसाल! टुरिंग टॉकीजची टूर टूर पडद्याआड

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : खूषखबर... खूषखबर...खूषखबर... माऊली टुरिंग टॉकीजमध्ये लवकरच... येणार येणार म्हणून गाजत असलेला... आणि आजपासून तुफान गर्दीत गाजणारा मस्त मराठी इस्टमन कलर रंगीत चित्रपट "धुमधडाका'... आज रात्रीपासून दाखल. पहिला खेळ रात्री सात वाजता, दुसरा खेळ रात्री साडेनऊ वाजता. तिकीट दर फक्त 3 रुपये... याल तर हसाल न याल तर फसाल...अशी जाहिरात आता कानावर बरीच वर्षे पडली नाही.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी अनेक मोठ्या गावांत टुरिंग टॉकीज असायच्या आणि त्यांची ती जाहिरात गल्लोगल्ली व्हायची. जत्रा यात्रांचे निमित्त साधून मग तंबूही फिरायचा. नवं 21 वे शतक उजाडलं आणि रंगीत टीव्ही आला, डिश-वाहिन्या आल्या आणि घरोघरी सिनेमा पोहचला. सिनेमा डिजिटल झाला आणि आणि रिळच्या सिनेमाचा तंबू गुंडाळावा लागला. एका पिढीवर अधिराज्य करणाऱ्या टुरिंग टॉकीजचं हे स्मृतीरंजन.

हेही वाचा- संसर्गासोबत वाढतोय मृत्यूचा आकडा; वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

एक काळ होता, जेंव्हा पेटीतल्या सिनेमाचा व्यवसाय तेजीत होता. टुरिंग टॉकीजला सिनेमा पाहणे गावाकडं चैन होती. जत्रा-यात्रांमध्ये पाळण्यांची ओढ असायची तेवढीच टुरिंग टॉकीजची. महिलांना तमाशा पाहता यायचा नाही. त्यांच्यासाठी दादा कोंडके, अलका कुबल, अशोक सराफ, चंद्रकांत, सूर्यकांत, निळू फुले यांचे मोठ्या पडद्यावरील दर्शन हाच खजाना. दोन-तीन गुंठे जागेत तंबू उभा राहायचा. कनाती, शुभ्र पडदा, वाहनात सिनेयंत्र आणि त्यातून निघणारा निळ्या रंगाच्या धुरासंगे पडदा व्यापणारा प्रकाश... पडद्यावर चित्र पुसट दिसायला लागले की प्रेक्षक जोरात ओरडायचे, "अरे, कार्बन जास्त सोड रेऽऽऽ.'

वाळूचे आसन, आकाशाचा छत...तरीही, त्याची मजा काही औरच होती. गावात दहा-वीस घरांतच टीव्ही. त्यामुळे टुरिंग टॉकीजची हौस भारी. मोठ्या गावांमध्ये हा एक व्यवसाय म्हणून वाढला. वाळव्यात तीन टॉकीज्‌ होत्या. "शिवाजी', "आयुप्रकाश' आणि "भागिरथी'. पेठ भागात गुडघ्याएवढा धुरळा होता, त्यात बसून लोक आनंद घ्यायचे. एकाने मराठी सिनेमा लावायचा, दुसऱ्याने हिंदी. "शिवाजी टॉकीज' पत्र्याच्या शेडमध्ये असल्याने बारमाही चालायचा. इतर दोन तंबूत दिवाळीला नारळ फुटायचा आणि पहिल्या पावसासंगे तंबू बंद व्हायचा.

मिरज तालुक्‍यात आरग, मालगाव, एरंडोली या गावांत परगावचे लोक सिनेमा पहायला यायचे. मिरजेत थिएटरला तिकीट दर 15 रुपये होता आणि तंबूत 3 रुपये. थिएटरला नवे सिनेमे यायचे, दोन-तीन आठवडे झाले की तेथून काढलेली पेटी तंबूत आणायची. अनेकदा ती पेटी म्हणजे तंबू मालकासाठी खजाना असायचा तर कधीकधी पेटी आणायचे एसटी भाडेही निघायचे नाही, असे त्यावेळचे थिएटर मालक दीपक बाबर सांगतात. त्यांचे वडील शंकर बाबर तंबू चालवायचे.

आरगेचा बाजार वाढला याला काहीअंशी गावातील सिनेमाचा तंबूही कारणीभूत होता, असे ज्येष्ठ छायाचित्रकार बी. आर. पाटील सांगतात. वाकुर्डे खुर्द येथील सुखदेव गुरव यांनी पाच-सात वर्षे फिरून तंबू चालवला. 2004 ला त्यांना शेवटचा सिनेमा लावला. गणपती उत्सव, हनुमान जयंती, राम नवमी अशा उत्सव काळात संयोजक मंडळे गावकऱ्यांसाठी मोफत सिनेमा आणायची. एक पडदा आणि छोटे मशीन... झाला सिनेमा सुरू. चौक पूर्ण भरायचा. अनिल कपूरचा "लाडला', "जुदाई'; गोविंदाचा "राजाबाबू', अमिताभ बच्चन यांचा "जंजीर', "दिवार'; लक्ष्मीकांत बेर्डे यांचा "धुमधडाका', "थरथराट' हे सिनेमे म्हणजे तिकीट बारीवर गर्दी. हे सिनेमे मंडळातर्फे मोफत दाखवायला मिळावेत म्हणून महिनाभर आधी पेटीचे बुकिंग केले जायचे. या साऱ्या तंबू सिनेमावर प्रकाश टाकणारा "टुरिंग टॉकीज्‌' हा मराठी सिनेमा गजेंद्र अहिरे यांनी बनवला. तो अनेक चित्रपट महोत्सवांत गाजला... वातानुकूलित सिनेमागृहात दोनशे रुपयांचे कुरकुरे खात सिनेमा पाहणाऱ्या पिढीला वडिलांनी आपण पाहिलेल्या सिनेमाची ही गोष्ट सांगितली तर कदाचित पटणार नाही. त्या पिढीचा मनात आजही सिनेमाचा तो तंबू "घर' करून आहे.

किस्से सिनेमाचे

सुषमा शिरोमणी हे नाव मराठी सिनेसृष्टीत प्रख्यात आहे. त्यांचा नायिका म्हणून पहिला सिनेमा ठरला तो "रंगू बाजारला जाते'. हा सिनेमा आणि सांगली हे वेगळं नातं आहे. पुणेकर निर्माते राम डवरी यांनी सांगलीकरांना घेऊन सांगलीत हा सिनेमा केला. संगीतकार होते बाळ पळसुले. नायक होते अरुण नाईक. खलनायक होते बाबूराव सांभारे, प्रमुख सहायक दिग्दर्शक होते मोहन कुंभोजकर. येथील . पोळ हे सहायक निर्माते होते. हा सिनेमा खूप गाजला. आनंद चित्रपटगृहात तो 17 आठवडे होता आमि पुण्यात त्याने रौप्यमहोत्सव केला.

Edited By- Archana Banage