वाहतुकीचा तिढा महिनाभरात सुटणार 

शैलेन्द्र पाटील
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सातारा - येथील पोवई नाक्‍यावरील वाहतूक कोंडीचा तिढा लवकरच सुटणार आहे. मात्र, त्यासाठी सातारकरांना महिनाभर कळ सोसावी लागेल. पुढील महिन्यात कर्मवीर पथ (खालचा रस्ता) पोवई नाक्‍यावर खुला करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने विकसक कंपनीने ग्रेड सेपरेटरच्या कामाला वेग दिला आहे. 

सातारा - येथील पोवई नाक्‍यावरील वाहतूक कोंडीचा तिढा लवकरच सुटणार आहे. मात्र, त्यासाठी सातारकरांना महिनाभर कळ सोसावी लागेल. पुढील महिन्यात कर्मवीर पथ (खालचा रस्ता) पोवई नाक्‍यावर खुला करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने विकसक कंपनीने ग्रेड सेपरेटरच्या कामाला वेग दिला आहे. 

ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असताना काल (ता. 31) रात्री नऊ वाजता मराठा खानावळीजवळ रस्ता खचला. ग्रेड सेपटरेटरसाठी खोदकाम सुरू असताना बाजूची दगड-माती ढासळू लागली. कामगारांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने काम बंद करून रस्त्यावर पाहणी केली. त्यावेळी मराठा खानावळीसमोर एका बाजूने रस्ता खचू लागला होता. वाहतूक पोलिसांनीही या रस्त्यावरील वाहतूक तातडीने मरिआई कॉम्प्लेक्‍सच्या मागून मोनार्क चौकाकडे वळवली. मरिआई कॉम्प्लेक्‍सच्या दारातील रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य असल्याने रहदारीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे. या ठिकाणचा धोका काढून टाकेपर्यंत हा रस्ता खुला करता येणार नाही, असे वाहतूक पोलिस शाखेने स्पष्ट केले. सातारकरांना पोवई नाक्‍यावरून पूर्वेकडे येण्या-जाण्यासाठी मरिआई कॉम्प्लेक्‍समागील रस्ताच वापरावा लागणार आहे. आणखी महिनाभर कळ सोसावी लागणार आहे. 

टप्प्याटप्प्याने काम हाती... 
ग्रेड सेपरेटरच्या कामाच्या नियोजनासंदर्भात टी ऍण्ड टी इन्फा लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले, की ""पोवई नाका हे शहरातील वाहतुकीचे मुख्य ठिकाण असल्याने कमीत कमी वाहतुकीस त्रास होईल, या दृष्टीने जास्तीत जास्त काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरचे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. पूर्व नियोजनानुसार कर्मवीर पथावरून पोवई नाक्‍यावर येऊ इच्छिणाऱ्या वाहनांना शिवाजी सर्कलजवळ स्लॅब टाकण्यात येत आहे. हे काम महिनाअखेर पूर्ण होऊन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मवीर पथ (सध्या पोवई नाक्‍यावर बंद बसलेला रस्ता) खुला होईल. त्याचवेळी राजपथावरील वाहतूक मरिआई कॉम्प्लेक्‍सच्या दारात बंद करण्यात येणार होती. कालच्या घटनेमुळे हा रस्ता नियोजनाआधीच बंद करावा लागला.'' 

नियोजनानुसार महिनाभरात शिवाजी सर्कलजवळ कर्मवीर पथ खुला होईल. त्यामुळे मोनार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका होईल. हा रस्ता पूर्वीप्रमाणे एकेरी वाहतुकीसाठी वापरता येईल. 
- संपर्क प्रतिनिधी, टी ऍण्ड टी इन्फा लिमिटेड 

वाहतुकीचा भार वाढल्याने रस्ता खचला? 
पोवई नाक्‍यावरील मराठा खानावळ ते मरिआई कॉम्प्लेक्‍सच्या दारात ग्रेड सेपरेटरसाठी खोदकाम सुरू आहे. सुमारे 50 फुटांपर्यंत खोदकाम गेले आहे. पावसाचे पाणी जमिनीत शिरल्याने या ठिकाणचा भूस्तर खिळखिळा झाला. त्यातच रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावरील भार वाढल्याने या ठिकाणचा रस्ता खचला असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Web Title: Transport issue will be solved in a month