श्‍वसनविकार रुग्णांवर उपचार थांबले, लवचिक धोरण हवे

अजित झळके
Saturday, 19 September 2020

कोरोना नसलेल्या (नॉन कोविड) आणि कोरोना मुक्त झालेल्या जुन्या श्‍वसन विकाराच्या रुग्णांवर उपचार करणारी आरोग्य यंत्रणा सध्या ठप्प झाली आहे.

सांगली : कोरोना नसलेल्या (नॉन कोविड) आणि कोरोना मुक्त झालेल्या जुन्या श्‍वसन विकाराच्या रुग्णांवर उपचार करणारी आरोग्य यंत्रणा सध्या ठप्प झाली आहे. ही सर्व यंत्रणा सध्या कोविड रुग्णालय म्हणून काम करत आहे. या रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने फुप्फुसाला गंभीर स्वरूपाची इजा होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. 

याबाबत जिल्हा प्रशासन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी संयुक्तपणे धोरण ठरवण्याची गरज आहे. अन्यथा, कोरोना पाठोपाठ श्‍वसन विकाराच्या रुग्णांबाबत गंभीर प्रकार घडायला वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. काही रुग्णांच्या जीवावर बेतण्याचे प्रकारही घडले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 26 हजारांहून अधिक आहे. 10 हजार रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

बहुतांश मोठी रुग्णालये कोविड सेंटर म्हणून काम करत आहेत. येथील सर्व तज्ज्ञ डॉक्‍टरांची फौज त्याकामी लागली आहे. ती गरजही आहे. मात्र त्याचवेळी कोरोना नसलेल्या आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचे काय, हा सवाल सातत्याने पुढे आला आहे. त्यात आता श्‍वसनविकार असलेल्या जुन्या रुग्णांबाबत गंभीर बाबी समोर यायला लागल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, कोरोना पॉझिटिव्ह असेल तरच दाखल करून घ्या, अन्यथा घरी पाठवा, ही भूमिका रुग्णाच्या जीवावर बेतायला लागली आहे. 

धोरण लवचिक करा 
येथील श्‍वसन विकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके म्हणाले, "कोरोना झाल्यानंतर जे कोरोनामुक्त झाले त्यातील काही रुग्णांबाबत फुप्फुसाचा प्रश्‍न जटिल होत निघाला आहे. विशेषतः श्‍वसनाचे जुने विकार असणाऱ्यांची फुप्फुसे कमकुवत होत आहे. ऑक्‍सिजनची झडप बंदच होत नाही, असेही काहीजणांबाबत आढळले आहे. असे आठ-दहा रुग्ण माझ्या माहितीतील आहेत. त्यांना तातडीने वेगळ्या उपचाराची गरज आहे. काही रुग्णांच्या आहे. फुप्फुसाला काठिण्य येते आहे. त्याची कार्यक्षमता कमी होत आहे. हा प्रश्‍न जटिल व्हायची भीती आहे. अशा लोकांना दाखल करता येत नाही, उपचार घेता येत नाही, त्याचे काय करायचे? त्यांच्या आयुष्याबाबत काहीतरी गंभीर निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कोविडच्या धोरणात थोडी लवचिकता आवश्‍यक आहे.' 

तज्ज्ञांचीच गरज 
इस्लामपूर येथील डॉ. प्रवीण चव्हाण म्हणाले, "नॉन कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. तपासणी निगेटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णाला कुणी भरतीच करून घेत नाही. त्यांनी घरी उपचार कसे घ्यायचे? जनरल प्रॅक्‍टिशनर्सकडून उपचार शक्‍य नाहीत. तज्ज्ञ कोविडमध्ये व्यस्त आहेत. अशावेळी या रुग्णांसाठी काहीएक धोरण ठरणे गरजेचे आहे.'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treatment of respiratory patients stopped, a flexible strategy is needed