Belgaum : तिरंगी लढतीनं चुरस वाढणार; जारकीहोळींच्या उमेदवारीमुळं निकालाचं चित्र बदलणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरंगी लढतीनं चुरस वाढणार; जारकीहोळींच्या उमेदवारीमुळं निकालाचं चित्र बदलणार?

तिरंगी लढतीनं चुरस वाढणार; जारकीहोळींच्या उमेदवारीमुळं निकालाचं चित्र बदलणार?

बेळगाव : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या राष्‍ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही आपल्या विजयाची खात्री दिली आहे. मात्र मुख्य लढत भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ, कॉंग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्यात मुख्य लढत होणार असून तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या उमेदवारीमुळे निकालाचे चित्र बदलणार आहे. यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. माझ्या उमेदवारीमुळे भाजपला लाभ होणार असल्याचे लखन यांनी सांगितले आहे. मंगळवारी (ता. २३) उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जनता, कार्यकर्ते आणि मतदारांचा आपणास पाठिंबा असून आपल्या उमेदवारीमुळे भाजप उमेदवाराचे नुकसान होणार असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. मात्र माझ्यामुळे भाजप उमेदवार कवटगीमठ यांना फायदा होणार असल्याचे लखन यांनी सांगितले. भाजपकडे आपण उमेदवारी मागितलेली नाही, यामुळे आपण बंडखोर उमेदवार नसून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. असे त्यांनी सांगितले.

भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेले माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव करणे आपले उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे. विधान परिषद निवडणुकीत रमेश जारकीहोळी विरुध्द लक्ष्मी हेब्बाळकर अशी लढत होणार का? या प्रश्र्नावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच महांतेश कवटगीमठ यांना प्राधान्य मतांद्वारे निवडून आणणार असल्याचे सांगितले. लखन जारकीहोळी यांच्यासाठी आपण पक्षाकडे कधीच उमेदवारी मागितली नसून भाजप उमेदवारास निवडून आणणे आणि कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव करणे आपले उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया रमेश जारकीहोळी यांनी दिली.

केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी कॉंग्रसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या विजयाची खात्री दिली आहे. पक्ष आधारित निवडणूक होत आहे. यामध्ये कुटुंब राजकारणाचा संबंध येत नसून लखन यांच्या उमेदवारीचा फटका भाजप उमेदवारांस बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपणास पक्ष मुख्य असून प्रत्येक निवडणुकीत बंधूचे आव्हान असते, राजकारणात जय-पराजय आणि आव्हाने असणे स्वाभाविक आहे. मात्र या निवडणूकीत कॉंग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी प्राधान्य मतांद्वारे निवडून येणार असल्याचा विश्र्वास सतीश जारकीहोळी यांनी यावेळी व्यक्त केला.

loading image
go to top