न्यूझीलँडमध्ये अडकले आहेत कर्नाटकचे बारा अभियंते

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

न्यूझीलँड येथे कर्नाटकाचे १२ अभियंते अडकले असून त्यांना कर्नाटकात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याला साकडे घालण्यात आले आहे. राज्याचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी या संदर्भात परराष्ट्र खात्याला पत्र पाठविले आहे

बेळगाव : न्यूझीलँड येथे कर्नाटकाचे १२ अभियंते अडकले असून त्यांना कर्नाटकात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याला साकडे घालण्यात आले आहे. राज्याचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी या संदर्भात परराष्ट्र खात्याला पत्र पाठविले आहे. डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्या नावे ते पत्र आहे. ७ जून रोजी न्यूझीलँड येथील ऑकलंड येथून दिल्लीला एक विमान येणार आहे. त्या विमानातून कर्नाटकातील या १२ जणांना आणण्याची विनंती जारकीहोळी यांनी केली आहे. ते भारतात परतल्यानंतर आरोग्य खात्याच्या नियमानुसार त्यांना क्वारंटाईन केले जाईल अशी ग्वाही त्या पत्रातून देण्यात आली आहे.

हे १२ अभियंते राज्याच्या पाटबंधारे खात्याच्या सेवेत असून त्यामध्ये पाच महिला तर सात पुरुषांचा समावेश आहे. या अभियंत्यांना न्यूझीलँड येथील ख्राईस्टचर्च येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वॉटर अँड एटमासफीयर या संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. पण लॉकडाउनमुळे ते न्यूझीलँड येथेच अडकून पडले आहेत. न्यूझीलँड येथेही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे त्या देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित ठेवण्यात आली आहे. पण ७ जून रोजी न्यूझीलँड येथून विमान नवी दिल्ली येथे येणार आहे, त्यामुळेच पाटबंधारे मंत्री जारकीहोळी यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करून त्यांना कर्नाटकात  आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हे सर्व अभियंते ख्राईस्टचर्च येथे अडकले आहेत, त्यांना परत कर्नाटकात आणले जावे यावे यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून कर्नाटक सरकार व पाटबंधारे विभागावर दबाव टाकला जात आहे. त्या महिला अभियंत्यांची २ ते ७ वर्षे वयाची लहान मुले आहेत. त्यांचे व पालक व कुटुंबीय धास्तावले आहेत. त्यांचे कुटुंबीय सातत्याने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून त्यांना परत आणण्याची मागणी करीत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ते अभियंतेही फोन व ई-मेलच्या माध्यमातून आपली समस्या मांडत आहेत. त्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याचे व त्यांना आता त्यांच्या घराची ओढ लागल्याचे त्यांनी कळविले आहे. त्यांना आवश्यक आहार व भारतीयांच्या वापराचे साहित्य तेथे मिळत नसल्याची तक्रार आहे. केंद्र शासनाच्या वंदे भारत मिशन पोर्टलवर त्यांनी आपली नोंदणी केल्याचेही पाटबंधारे मंत्र्यांनी कळविले आहे. आता परराष्ट्र मंत्रालयाकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर त्यांची ७ जून रोजीची भारत वापसी निश्चित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve engineers from Karnataka are stranded New Zealand