जुळ्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू; ऐतवडे खुर्दमधील घटना

Twin sisters drown in lake; Incident in Aitwade Khurd
Twin sisters drown in lake; Incident in Aitwade Khurd

ऐतवडे खुर्द (जि. सांगली) : येथे तलावाशेजारीच राहणाऱ्या बर्गे कुटुंबातील पाच वर्षे वयाच्या जुळ्या बहिणींचा आज बुडून मृत्यू झाला. विद्या व वेदिका अशी त्या दोघींची नावे आहेत. या घटनेमुळे गाव व परिसरात शोककळा पसरली आहे. 

घटनेची माहिती अशी की, ऐतवडे खुर्द गावात भैरवनाथ मंदिर परिसरात तलाव आहे. काही अंतरावर विजय बर्गे यांचे घर आहे. त्यांना शेंगा वाळत घालायच्या होत्या. तलावाशेजारी पुरेशी जागा नसल्याने त्यांनी भैरवनाथ मंदिर परिसरात असलेली रिकामी जागा निवडली. शेंगांची राखण करण्यास विजय बर्गे दोन्ही मुलीसह गेले होते. काही वेळ थांबून भूक लागल्याने ते जेवायला घराकडे परतले. मुलीसोबतच होत्या. जेवण करून बर्गे जनावरांना वैरण आणण्यास शेतात गेले, मात्र विद्या व वेदिका खेळत खेळत शेंगा वाळत घातलेल्या ठिकाणी आल्या. तलावाशेजारी मोठे वडाचे झाड आहे.

झाडाच्या सावलीत खेळत असताना खेळण्याच्या नादात तलावाकडे कधी गेल्या समजलेच नाही. त्यांच्याकडे कुणाचे लक्षही गेले नाही. दुपारी साडेतीनच्या सुमारास मुली घरात नसल्याचे आईच्या लक्षात आले. शोधाशोध सुरू केली. चौकशी करीत त्या भैरवनाथ मंदिराच्या परिसरात आल्या. मंदिराच्या पुजाऱ्याकडे चौकशी केली. पुजाऱ्याने मुली खेळत होत्या, असे सांगितले. तलाव परिसरात शोधाशोध सुरू झाली. ग्रामस्थ व युवक जमले. सर्वांनी शंका येऊन तलावातही शोध घेतला. बांबूच्या काठीची आकडी पाण्यात सोडून चाचपणी केली. त्यात दोघी मृतावस्थेत आढळल्या. दोघींनी एकमेकींना घट्ट मिठ्ठी मारली होती. हा प्रसंग पाहून उपस्थित गहिवरले. घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. 

कुरळपचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद काटे यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. घटनेची कुरळप पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

आईला धक्का! 
मुलींचे जाणे अनेकांना धक्कादायक होते. मुलींच्या आईला ही घटना समजली तेव्हा त्यांना मान्यच झाले नाही. त्या सैरभैर झाल्या. त्यांनी हंबरडा फोडला. हे पाहून उपस्थित गलबलून गेले. "माझ्या मुली इथे परिसरातच खेळत आहेत' असे म्हणत मुलीची आई त्यांना शोधण्याचा प्रयत्न करीत होती. 

जन्म आणि मृत्यू सोबतच! 
विद्या आणि वेदिका जुळ्या बहिणी. दोघी सतत एकत्र असत. जन्माला एकत्र आल्या, तशा एकत्रच हे जगही सोडून गेल्या. जेव्हा त्या मृतावस्थेत आढळल्या. तेव्हाही त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. या प्रसंगाची घटनास्थळी चर्चा होती. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com