सौंदलग्याजवळ कार-दुचाकीच्या अपघातात दोन ठार; कुत्रा बचावला | Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident
सौंदलग्याजवळ कार-दुचाकीच्या अपघातात दोन ठार; कुत्रा बचावला

सौंदलग्याजवळ कार-दुचाकीच्या अपघातात दोन ठार; कुत्रा बचावला

सौंदलगा, कोगनोळी - राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा येथे कळंत्रे मळ्याजवळ दुचाकी व कारमध्ये (Bike and Car) अपघात (Accident) झाला. त्यात संकेश्वरमधील दुचाकीस्वारासह कारमधील मुंबईतील महिला असे दोन जण जागीच ठार (Death) तर कार चालक जखमी झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (ता. 17) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुन्ना अल्लाउद्दीन रप्पूगार (वय 36, अंकले रोड, संकेश्वर) व दिशा चंदन (वय २२, रा. मुंबई) अशी मृतांची तर तनय शहा (वय २२, रा. मुंबई) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मुंबई येथील कार (एमएच 03 सीबी 4915) राष्ट्रीय महामार्गावरून गोव्याला कोल्हापूरकडून निपाणीकडे जात होती. सौंदलग्याजवळ कार आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून याच रस्त्यावरून निपाणीकडे जात असलेल्या दुचाकीला (एमएच 09 एफयू 4802) जोराची धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार मुन्ना रप्पूगार हा जागीच ठार झाला. तर कार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाला धडकून पुढे सेवा रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कांद्याच्या शेतात पडली. या कारमधील दिशा चंदन ही ठार तर तनय शहा जखमी झाला. यावेळी वाहनधारकांसह प्रवाशांची महामार्गावर गर्दी झाली होती.

हेही वाचा: समाजकंटकांकडून बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

संकेश्वरमधील मयत मुन्ना रप्पूगार हा मेकॅनिकचे काम करत होता. त्याने महिन्यापूर्वीच नवीन दुचाकी घेतली होती. त्याच्या मागे पत्नी, लहान मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील, पोलिस अमर चंदनशिव, एम. एफ. नदाफ, एन. एस. सगरेकर यांनी भेट देऊन अपघातग्रस्त वाहनातील जखमींना निपाणी येथील महात्मा रुग्णालयात दाखल केले. महामार्गाच्या देखरेखीचे काम करणाऱया जय हिंद रोड डेव्हलपर्सच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. अपघाताबाबत अधिक माहिती घेण्याचे काम ग्रामीण पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

वाहने चक्काचूर होऊनही कुत्रा बचावला

अपघातग्रस्त कार राष्ट्रीय महामार्ग रस्ता पार करून दीडशे ते दोनशे फूट अंतरावर पलटी मारत कांद्याच्या पिकांमध्ये जाऊन पडली. अपघाताची भीषणता इतकी जोराची होती की कार व दुचाकीचा पूर्णत: चक्काचूर झाला. या कार गाडीमध्ये दोन व्यक्ती व कुत्रा होता. एवढा मोठा अपघात होऊनही कुत्र्यास कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे घटनास्थळी आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. दोघांच्या एअर बॅग असतानासुद्धा अपघातामध्ये फुटुन गेल्या होत्या. सेवा रस्त्यावर वाहनामधील साहित्य विखरून पडले होते.

Web Title: Two Death In Car And Two Wheeler Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :accidentdeathcarBike