सातारा - कोल्हापूर पॅसेंजरला जादा दोन डबे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

मिरज - रेल्वे प्रवाशांनी काल जयसिंगपूर व रुकडी येथे डेमू रोखून धरल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. एका डेमू पॅसेंजरसाठी दोन जादा डब्यांची व्यवस्था केली. पुण्याहून ते मिरजेत दाखल झाले असून उद्या कोल्हापूरला निघणाऱ्या डेमूला जोडण्यात येतील. उर्वरित तीन गाड्यांनाही प्रत्येकी दोन जादा डबे जोडण्याचे नियोजन आहे. 

मिरज - रेल्वे प्रवाशांनी काल जयसिंगपूर व रुकडी येथे डेमू रोखून धरल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. एका डेमू पॅसेंजरसाठी दोन जादा डब्यांची व्यवस्था केली. पुण्याहून ते मिरजेत दाखल झाले असून उद्या कोल्हापूरला निघणाऱ्या डेमूला जोडण्यात येतील. उर्वरित तीन गाड्यांनाही प्रत्येकी दोन जादा डबे जोडण्याचे नियोजन आहे. 

प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत डेमूला कमी डबे असल्याने संतप्त प्रवाशांनी काल जयसिंगपूर व रूकडी येथे पॅसेंजर रोखून आंदोलन केले. त्यानंतर रेल्वे संघटना व सल्लागार समितीच्या सदस्यांनी रेल्वे बोर्डाशी संपर्क साधून डबे वाढवण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर तातडीने एका गाडीला दोन डबे मान्य झाले. येत्या दोन महिन्यांत इतर तीन गाड्यांनाही दोन जादा डब्यांचे नियोजन आहे. 

सांगली - कोल्हापूर मार्गावर पॅसेंजरच्या आणखी तीन फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली. सांगली-बेळगाव, सांगली-कुर्डूवाडी व कऱ्हाड-सोलापूर या गाड्यांचीही मागणी केली. 

सांगली-कोल्हापूर प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सातारा-कोल्हापूर पॅसेंजर सांगलीतच भरते. त्यानंतर पुढील स्थानकांवर जागाच मिळत नाही. सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुपचे उमेश शहा यांनी सांगितले की, सांगलीत तीन प्लॅटफॉर्म दिवसभर रिकामे असतात. तेथून कोल्हापूरसाठी जादा गाड्या सोडता येतात. त्यामुळे सातारा- कोल्हापूर पॅसेंजरवरील ताणही कमी होईल. 

मिरजेतून सकाळी साडेसहाला सुटणारी कुर्डुवाडी पॅसेंजर सांगलीतून सोडावी, तिला विश्रामबाग थांबा द्यावा, अशीही मागणी पुणे विभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे. यामुळे सांगली, माधवनगर, बुधगाव आदी परिसरांतून पंढरपूरला जाणाऱ्या हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. मिरज-सोलापूर एक्‍स्प्रेस कऱ्हाडमधून सोडावी, तिला ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली व विश्रामबाग थांबे द्यावेत अशीही मागणी आहे. यासाठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय निलावार यांनी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना साकडे घातले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two extra bogies to Satara - Kolhapur Passenger