राज्यातील दोनशे बॅडमिंटन प्रशिक्षकांचे साकडे; इनडोअर हॉलमधील खेळांना परवानगी द्या

घनशाम नवाथे 
Tuesday, 15 September 2020

तत्काळ इनडोअर हॉलमधील खेळांना परवानगी द्यावी, यासाठी राज्यातील 200 बॅडमिंटन प्रशिक्षकांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आदींना साकडे घातले आहे. 

सांगली : सहा महिन्यापासून लॉकडाउन आणि अनलॉक काळात इनडोअर हॉलमधील खेळ बंद अवस्थेत आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो प्रशिक्षक आणि त्यांच्यावर अवलंबून कुटुंबिय कठीण परिस्थितीतून जात आहेत. त्यामुळे तत्काळ इनडोअर हॉलमधील खेळांना परवानगी द्यावी, यासाठी राज्यातील 200 बॅडमिंटन प्रशिक्षकांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आदींना साकडे घातले आहे. 

सध्या संपूर्ण जगात कोरोना संसर्ग फैलावला आहे. देशात देखील खेळासह सर्व क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे. देशातील प्रशिक्षक विशेषत: इनडोअर खेळामध्ये भाग घेणाऱ्यांना त्याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला आहे. कारण सरकारने इनडोअर हॉल सुरू करण्यास अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. गेल्या सहा महिन्यांपासून वाढीव लॉकडाऊनमुळे शेकडो प्रशिक्षक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना कठीण परिस्थितीतून जावे लागत आहेत. अनलॉक प्रक्रियेत सरकारने काही कामांमध्ये शिथिलता दिली असली, तरी इनडोअर खेळ सुरू करण्यास त्यांनी प्राधान्य दिले नाही. इनडोअर खेळाची संघटना एकत्रित नसल्यामुळे तसेच प्रशिक्षक नोंदणीकृत नसल्यामुळे त्यांची समस्या वाढली आहे. 

इनडोअर हॉलमधील खेळांना मंजुरी मिळावी या आशेने प्रदीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर जवळपास दोनशे बॅडमिंटन प्रशिक्षक एकत्र आले आहेत. त्यांनी आघाडी करून खेळ सुरू करण्याच्या मागणीसाठी लढा देण्याचे ठरवले आहे. बॅडमिंटन सराव पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील 200 प्रशिक्षकांनी निवेदनावर सही करून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, क्रीडामंत्री सुनिल केदार, राज्य बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरूण लखानी, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष डॉ. हेमंत बिस्वा शर्मा यांना पाठविले आहे. 

सध्या कोरोना आपत्तीच्या काळात इनडोअर हॉलमधील खेळांना परवानगी दिल्यास शासनाच्या सर्व नियमाचे पालन केले जाईल. खेळाचा सराव करताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही निवेदनात म्हटले आहे. 

नियमाचे पालन करून प्रशिक्षण देण्यास आम्ही सज्ज

सहा महिने इनडोअर खेळ पूर्णपणे बंद आहेत. सध्या अनलॉक प्रक्रियेत अनेक गोष्टींमध्ये शिथिलता आणली आहे. त्याचप्रमाणे इनडोअर हॉलमधील खेळास परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नियमाचे पालन करून खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास आम्ही सज्ज आहे.'' 
- धीरजकुमार, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred badminton coaches in the state; Allow games in indoor halls