esakal | विट्यात बेकायदेशीर सावकारी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

vita

विट्यात बेकायदेशीर सावकारी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विटा : येथे बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या दोघांना विटा पोलिस व सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने पकडले. प्रशांत सुरेश भारते ( वय २७, रा. रेणावी, ता. खानापूर ) व सागर बबन सोनवणे ( वय ३४, विटा ) अशी सावकारी करणारांची नांवे आहेत. त्यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता सह्या केलेले कोरे चेक, कोरे बाँड मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत. त्यांचेकडील इनोव्हा बुलेट मोटरसायकल, वोक्सवॅगन चॅटो, स्कुटी अशी वाहने व रोख २९ हजार रुपये असा सुमारे १ लाखांचा मुद्देमाल व तीन मोबाईल जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. याबाबत मदन विठ्ठल शितोळे ( वय ४५,भवानीनगर, विटा ) यांनी वरील दोघा सावकाराविरूध्द विटा पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर खंडणी व सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की शितोळे यांनी प्रशांत भारते व त्याचा भागीदार सागर सोनवणे यांच्याकडून २ जुलै २०२० ला ५ टक्के व्याजाने ५ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्ज घेतेवेळी शितोळे यांच्याकडून भारते व सोनवणे यांनी शितोळे यांच्या मालकीचा विटा हददीतील गट नं ३३१/१ मधील प्लॉट नंबर २ तारण म्हणून साठेखत करून घेतला. त्यांनी प्रथम मासिक ५ टक्के व्याजदर ठरवून नंतर व्याजदर ५ टक्क्यावरून १० टक्के केला. शितोळे यांनी त्यांना ५ लाख १७ हजार ५०० रुपये परत करून देखील १० टक्के व्याजाचे अधिक ४ लाख रुपये मागणी केली. पैसे दिल्याशिवाय साठेखत फिरवुन देणार नाही. असे त्यांनी शितोळे यांना धमकावुन प्लॉटवर कायमस्वरूपी कब्जा करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

याशिवाय फोनवरून साठेखत केलेल्या प्लॉटवर पाऊल ठेवायचे नाही. असे म्हणून वरील दोघे धमकावत आहेत. अनावश्यकरित्या ४ लाख रुपये खंडणी स्वरूपात मागणी करीत आहेत. खंडणीचे पैसे न मिळाल्यास शिवीगाळ करून घरात घुसून मारीन अशी मोबाईल वरून धमकी दिलेली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर‌ पुढील तपास करीत आहेत.

जर कोणाची बेकायदेशीर सावकारीसंदर्भात तक्रार असेल व कोण खंडणी मागत असेल तर त्यांनी निर्भयपणे पोलिस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी. आम्ही संबंधितावर गुन्हे दाखल करू.

संतोष डोके,

पोलिस निरीक्षक, विटा.

loading image
go to top