घरफोडीतल्या चोरट्यांचा केला फिल्मी स्टाईलने पाठलाग अन...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

सांगली येथील जुना धामणी रस्त्यावर पावणे सहा लाखांची घरफोडी करून पलायन करणाऱ्या दोघांचा फिल्मी स्टाईलने पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग केला.

सांगली ः येथील जुना धामणी रस्त्यावर पावणे सहा लाखांची घरफोडी करून पलायन करणाऱ्या दोघांचा फिल्मी स्टाईलने पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग केला. दोघांनाही पकडले असून त्यातील एकास अंकलीतील कृष्णा नदीतून ताब्यात घेतले आहे. पहाटे पाचच्या सुमारास हा थरार सांगलीत सुरू होता.

दरम्यान, दोघांनाही विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. मेहरसिंग रामसिंग गुदंड (वय 25) व करण मनोदर भवर (24, रा. खणी अंबा, ता. कुकशी, जि. घार, मध्यप्रदेश) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आले. प्रदीप गणपतराव चव्हाण (वय 59) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रदीप चव्हाण हे जुना धामणी रस्त्यावरील इरसेड वनजवळील सिद्धिवल्लभ कृपा अपार्टमेंटमध्ये राहतात. चव्हाण हे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास हातकणंगले (कोल्हापूर) येथील सासरवाडीत गेले होते. दोघा संशयित चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाळत ठेवून दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील पाच तोळ्याचा लक्ष्मी हार, एक तोळ्याचा सोन्याचा टिक्का, चार तोळ्याच्या बांगड्या, पाच तोळ्याच्या अंगठ्या, तीन गंठण, तीन सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे ताट, फुलपात्र, वाट्या, पळी-पंचपात्र, रोख साठ हजार असा एकुण पाच लाख 42 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरला. 

दरम्यान, अपार्टमेंटमधील अभिजीत जाधव यांना चव्हाण यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले. पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी तातडीने परिसरातील लोकांना गोळा केले. लोक गोळा झाल्याचे समजताच चोरट्यांनी बाल्कनीतून उडी मारून पळ काढला. धामणीच्या दिशेने दोघेही पळू लागले. याचवेळी विश्रामबाग पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलिसांचे पथक आणि भागातील नागरिकांनी दोघांचा पाठलाग केला. त्यातील करण भवर याला लोकांनी ताब्यात घेतली आणि पोलिसांच्या हवाली केली. त्याचवेळी मेहरसिंग गुंदड याने अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीत उडी घेतली. नदीच्या दोन्ही बाजूला पोलिस आणि नागरिक उभे होते. तब्बल दीड तासानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे व त्यांचे पथक, एलसीबीचे सागर लवटे, बिरोबा नरळे, अमित परटी, सुरेश पाटील यांचा या कारवाईत सहभाग होता. 

पोलिस जखमी 
दोघांचाही पाठलाग करत असताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील राहुल क्षीरसागर हे पोलिस जखमी झाले. तरीही त्यांनी पाठलाग सुरू ठेवत संशयितास ताब्यात घेतले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठांनी कौतुक केले. 

गुन्हेगारांचा अड्डा 
दोघेही संशयित मध्यप्रदेशमधील घार जिल्ह्यातील खणी या गावचे आहेत. त्याठिकाणी गुन्हेगारांचा अड्डा आहे. अनेक सराईत गुन्हेगार चारचाकी-दुचाकी आणि घरफोड्यात दिसून आले आहेत. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगारा आहेत का, याची तपासणी केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two robber's followed in Filmy style in Sangali