आष्टा-सांगली रस्त्यावर ट्रकने दिलेल्या धडकेत दोघे ट्रॅक्‍टरचालक मित्र ठार

तानाजी टकले
Wednesday, 25 November 2020

आष्टा-सांगली रस्त्यावर मालवाहतूक ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत दोघा ट्रॅक्‍टरचालक मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

आष्टा (जि. सांगली) ः आष्टा-सांगली रस्त्यावर मालवाहतूक ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत दोघा ट्रॅक्‍टरचालक मित्रांचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश परसू नंदीवाले (वय 20, रा. मूळ गाव दानोळी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर सध्या रा. खोत मळा रोड, आष्टा) व विजय चंद्रकांत पेठकर (वय 19, रा. बागणी, ता. वाळवा) अशी मृतांची नावे आहेत. 

मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची आष्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ट्रकचालकावर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत आष्टा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत प्रकाश व विजय हे अंगद ट्रॅक्‍टरवर चालक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री दोघे जण उसाने भरलेले अंगद सर्वोदय कारखान्याला घेऊन गेले होते. ते पहाटे परतत असताना मिरजवाडी (ता. वाळवा) येथे एकाचा ट्रॅक्‍टर बंद पडला. दोघांनीही तो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

डिझेल टाकीतील एअर काढत असताना पाठीमागून सांगलीहून येणाऱ्या भरधाव ट्रकने (केए 23, बी 6734) रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या ट्रॅक्‍टरला (एमएच 13, एजे 4708) पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत पाठीमागील अंगद पुढे सरकल्याने प्रकाश व विजय हे दोन्हींमध्ये अडकले. अंगद विजयच्या पोटात घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला; तर प्रकाश याचे ट्रॅक्‍टरच्या टपामध्ये तोंड अडकल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलिसपाटील हरिदास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली व मदतकार्य केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. 

प्रकाश नंदीवाले याचे मूळ गाव दानोळी आहे. चार-पाच वर्षांपासून आई-वडील, लहान भाऊ यांच्यासोबत तो खोत मळा रोडवरील एका झोपडीत राहत होता. आई-वडील शेतमजुरी करतात, तर लहान भाऊ दुकानात काम करतो. त्याच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.

विजय हा बागणी येथे वडील, भाऊ यांच्यासोबत राहत होता. त्याच्या आईचे निधन झाले आहे. चार दिवसांपासून तो बदली चालक म्हणून काम पाहत होता. मृत प्रकाश व विजय दोघेही अविवाहित होते. कुटुंबातील दोन्ही कर्त्या तरुणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two tractor driver friends were killed in a truck collision on Ashta-Sangli road