हेडलाइट फुटलेली चोरीची दुचाकी घेऊन आला अन्‌..

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

- चोरट्याकडून पाच दुचाकी जप्त 
- रेकॉर्ड वरच्या गुन्हेगाराला अटक
- गुन्हे शाखेची कामगिरी

सोलापूर : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाने सुनील ऊर्फ सोन्या भोसले (वय 25, रा. पाटोदा, जि. उस्मानाबाद) यास अटक केली आहे. हेडलाइट फुटलेली चोरीची दुचाकी घेऊन तो सोलापूरच्या दिशेने येत होता. तेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून त्यास पकडले. 

पसारेवस्ती परिसरात लावला सापळा
गुन्हे शाखेच्या पथकाने सुनील भोसले याच्याकडून एक लाख 65 हजार रुपयांची चोरीची पाच दुचाकी वाहने जप्त केली आहेत. भोसले याने सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून दुचाकी वाहने चोरी केल्याचे समोर आले. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित तरुण तुळजापूर येथून सोलापूरकडे येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला समजली. त्याच्या अंगावर काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन पॅन्ट होती. महत्त्वाचे म्हणजे तो ज्या दुचाकीवर येत होता, त्याची हेडलाइट फुटली होती. 
गुन्हे शाखेच्या पथकाने पसारेवस्ती परिसरात सापळा लावला.

मैत्रिणीला सांगितले आत्महत्या करणार..! अन्‌..
पाच दुचाकी वाहने जप्त
एक तरुण हेडलाइट फुटलेली दुचाकी घेऊन येत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला; मात्र त्याने दुचाकी वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. चौकशीत त्याने सोलापुरातील भवानी पेठेतील एका अपार्टमेंट जवळून साथीदाराच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे कबूल केले. अधिक चौकशीत वैराग, किल्लारी येथूनही दुचाकी वाहनांची चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून एक लाख 65 हजार रुपयांची पाच दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. मेकॅनिकच्या हाताखाली काम करणे तसेच मिळेल तिथे मजुरी करत होता. चोरी करत असल्याचे चौकशीत समोर आले. 

यांनी केली कामगिरी
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ऋषिकेश पवळ, अजित कुंभार, पोलिस हवालदार बाबर कोतवाल, दिलीप नागटिळक, राकेश पाटील, संतोष फुटाणे, शीतल शिवशरण, जयसिंग भोई, सचिन बाबर, वसंत माने, स्वप्नील कसगावडे, उमेश सावंत, समर्थ शेळवणे, गणेश शिंदे, अश्रूभान दुधाळ, चालक निंबाळकर, काकडे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two-wheeler thief arrested