उदयनराजेंना मिळाला राजकीय 'ब्रिदिंग पिरियड'

Satara-MP-Chattrapati-Udayanraje-Bhosale
Satara-MP-Chattrapati-Udayanraje-Bhosale

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लांबणवीर पडल्याने माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या निर्णयाप्रती निर्माण झालेली विरोधी लाट ओसरण्यास मदत झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त लोकांमध्ये मिसळून जनमत घेण्याची संधी मिळाल्याने त्यांना राजकीय ब्रिदिंग पिरियड मिळाला आहे. कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसला देखील विधानसभा निवडणुकीच्या जनमतावर उदयनराजेंच्या विरोधात स्ट्रेटजी करण्यास वेळ मिळाला आहे. परिणामी लोकसभेची पोटनिवडणुकीची रंगत आतापासूनच वाढल्याचे चित्र आहे. 

विधानसभा निवडणुकीबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर ठिकठिकाणच्या बातमीदारांनी उदयनराजेंच्या दृष्टीने हा निर्णय फायद्याचा आहे तोट्याचा याबाबत कानोसा घेतला. बहुतांश तालुक्‍यांतून उदयनराजेंना पोटनिवडणूक सोपी जाणार नाही, अशी चर्चा आहे तर दुसरीकडे उदयनराजेंना राजकीयदृष्ट्या मोकळा श्‍वास घेण्याची संधी मिळाल्याने त्याचा फायदा होईल, असे संमिश्र चित्र उमटले आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार नसल्याचा काही अंशी फायदा उदयनराजे भोसले यांना होईल; परंतु तोटा अधिक असेल. खासदारकीचा राजीनामा व पक्षांतर या त्यांच्या दोन्ही गोष्टी जनतेला रुचलेल्या नाहीत. या निर्णायाचा फटका त्यांना मतदानातून बसला असता. आता लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होईपर्यंत ही विरोधी लाट कमी होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीत उदयनराजे यांची कामगिरी कशी राहील? याकडे सर्वांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्याशिवाय उदयनराजे यांच्या विरोधात रणनिती आखण्यासाठी विरोधकांना विशेषत: राष्ट्रवादीला भरपूर वेळ मिळणार आहे. त्यामुळे लोकसभेची पोटनिवडणूक पुढे जाणे हे उदयनराजे यांच्यासाठी फायद्यापेक्षा तोट्याचेच अधिक ठरेल अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसह झाली असती तर उदयनराजे यांच्या निर्णयाचे पडसाद भाजपच्या मतदानावर सर्व जिल्ह्यात झाला असता. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला असता. त्यामुळे उदयनराजेंची पोटनिवडणूक लांबणवीर पडलेली हे भाजपच्या फायद्याचे ठरणार आहे असे ही सांगितले जात आहे. 

'तेलही गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे' अशी अवस्था उदयनराजेंची पोटनिवडणूक निवडणूक लांबणीवर पडल्याने झाल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात होऊ लागली आहे. खासदारकीचा राजीनामा देऊन पदरात काहीच पडले नाही, अशी खंत सर्मथकांमधून उमटू लागली आहे. 

उदयनराजे यांनी घेतलेला निर्णय लोकांना रुचला नाही. त्यामुळे सातारा शहरात सध्या तरी त्यांच्याबाबत नाराजी आहे. ही नाराजी मतपेटीतून व्यक्त झाली असती. लोकसभा पोटनिवडणूक पुढे गेल्याने उदयनराजे यांना लोकांमध्ये मिसळून अंदाज बांधणे शक्‍य होणार असल्याने त्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, अशीही चर्चा आहे.विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुढील रणनीती अवलंबून राहील. त्यामुळे नेमके आत्ता सांगता येणार नाही असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com