Video : उदयनराजे सध्या काय करतात...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

आगामी काळात उदयनराजेंना राज्यसभेवर संधी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. लाेकसभा पाेटनिवडणुकीच्या पराभवानंतरही उदयनराजेंनी आपले समाजसेवेचे व्रत सुरुच ठेवले आहे. सध्या उदयनराजे हे सातारा येथील त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी नागरीकांच्या अडीअडचणी साेडवित असतात. 

सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपने केलेली आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर उदयनराजेंची निवड होणार असल्याच्या चर्चेस पुन्हा उधाण आले आहे. उदयनराजेंना केंद्रात मंत्री करण्यावर देखील विचारविनिमय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार निवडून येऊन देखील पक्षाला राज्यात सत्ता मिळू शकली नाही. भाजपचा मित्र पक्ष शिवसेना या पक्षाने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यासमवेत जात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. परिणामी राज्यात सध्या भाजप मागे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात पक्षाची ताकद मजूबत करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास प्रारंभ केला आहे. राज्यात पक्षाची छाप उमटविण्यासाठी माजी खासदार उदयनराजेंना पुन्हा दिल्लीत पाठविण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांचे प्रयत्न सुरु झाल्याची चर्चा आहे. 
सध्या राज्यसभेचे महाराष्ट्रात एकूण एकोणीस खासदार आहेत. त्यापैकी सात खासदार येत्या दोन एप्रिलला निवृत्त होणार आहेत. यामध्ये शरद पवार, मजिद मेमन (राष्ट्रवादी), अमर साबळे (भाजप), राजकुमार धूत (शिवसेना), हुसेन दलवाई (कॉंग्रेस) , रामदास आठवले (आरपीआय) , संजय काकडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

हेही वाचा -  Video : अन् जवानांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभा सदस्य झाले होते. भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश आहे. त्यांचीही मुदत दोन एप्रिलला संपत आहे. भाजपचे दुसरे खासदार अमर साबळे यांची मुदतही त्याच दिवशी म्हणजेच दोन एप्रिलला संपणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर उदयनराजेंना नियुक्ती दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे.

उदयनराजेंचा दिनक्रम... 

लाेकसभा पाेटनिवडणुकीनंतरही उदयनराजेंनी आपले समाजसेवेचे व्रत सुरुच ठेवले आहे. सध्या उदयनराजे हे सातारा येथील त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी नागरीकांच्या भेटी गाठी घेत असतात. त्यांच्याकडे दररोज सुमारे 50 ते 60 नागरीक या ना त्या कारणाने येतात. यामध्ये युवा वर्गाबरोबरच ज्येष्ठांची देखील लक्ष्णीय संख्या आहे. कोणाला बॅंक अधिकारी कर्ज नाही तर कोणाला प्रशासकीय कामकाजाचा फटका बसल्याच्या तक्रारी उदयनराजेंपर्यंत पोहचल्या असतात. ते कधी संयमाने तर कधी त्यांच्या स्टाईलने अडलेल्या नडलेल्यांची काम करताना दिसतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Solves Problems Of People