उदयनराजेंनी स्वतःच केली उमेदवारी जाहीर; उद्या अर्ज दाखल करणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 September 2019

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. अर्थातच, सातऱ्यात भाजपतर्फे उदयनराजे हेच उमेदवार असतील हे निश्चित होते.

सातारा : साताऱ्यासाठी विधानसभा निवडणुकीसोबतच म्हणजे 21 ऑक्‍टोबरला मतदान होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे यांनी स्वतःच भाजपकडून उमेदवारी जाहीर केली. उदयनराजेंनी फेसबुक पोस्ट करत शिवेंद्रराजेंसह उद्या (1 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.

साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणूक 21 ऑक्टोबरला होणार असून 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी होईल. या प्रतिष्ठेच्या मतदार संघासाठी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला आहे. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, राष्ट्रवादीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला आहे. याठिकाणी आघाडीकडून उदयनराजेंना जोरदार लढत देण्यात येणार आहे.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. अर्थातच, सातऱ्यात भाजपतर्फे उदयनराजे हेच उमेदवार असतील हे निश्चित होते. पण, भाजपने उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच उदयनराजे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून ते स्वतः आणि शिवेंद्रराजे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असे म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale declare candidateship in Satata Loksabha bypoll