उजनीतून पाणी सोडले; शहरात विस्कळितपणाच

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 30 मे 2018

सोलापूर - सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून  मंगळवारी सायंकाळी 600 क्‍युसेकने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. हे पाणी औज बंधाऱ्यात पोचण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

सोलापूर - सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून  मंगळवारी सायंकाळी 600 क्‍युसेकने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. हे पाणी औज बंधाऱ्यात पोचण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

सध्या धरण मायनसमध्ये असल्याने सुरवातीला गाळमोरीतून पाणी सोडण्यात आले आहे. त्यात हळूहळू वाढ करण्यात येणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत चार हजार क्‍युसेक तर रात्रीनंतर आठ हजार क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सध्या तरी 600 क्‍युसेक एवढाच विसर्ग ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे उजनी पंपगृहाचा वीजपुरवठा तब्बल साडेअकरा तास खंडित झाल्याने पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.  बुधवारी होणारा पाणीपुरवठा गुरुवारी, तर गुरुवारी होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी होणार आहे. 

उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात पोचण्यास किमान आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यानच्या कालावधीत शहरातील पाणीपुरवठा विस्कळितच राहणार आहे. त्यातच वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचाही फटका बसला आहे.

सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले असून, सध्या तीनऐवजी चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. औजमध्ये पाणी पोचले, तरी विजेच्या लपंडावामुळे ऐन पावसाळ्यातही पाणीपुरवठ्यातील विस्कळितपणा कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

असा होईल पाण्याचा प्रवास 
उजनी धरण - पंढरपूर - पुळुज - बठाण - बेगमपूर - माचणूर - वडापूर - भंडारकवठा - बाळगी - सादेपूर - लवंगी-कारकल - औज (हा प्रवास एकूण 207 किलोमीटरचा आहे)

Web Title: ujani dam water