रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

अंगडी यांना दोन आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

बेळगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तसेच बेळगावचे खासदार रेल्वे राज्यमंत्री सुरेश चन्नबसाप्पा अंगडी (वय ६५) यांचे आज (23) निधन झाले. गेल्या काही दिवसापासून दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अंगडी यांना दोन आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण, बुधवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक नाणारमधील जमीन व्यवहारात : नीलेश राणे

सुरेश अंगडी हे 2004 सालापासून बेळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बेळगाव मतदार संघातून ते विक्रमी मतांनी निवडून आले होते. सलग चौथ्यांदा भारतीय जनता पक्षातून ते लोकसभेवर निवडून गेले. त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांना रेल्वे राज्यमंत्रीपदाचे स्थान मिळाले. रेल्वे राज्यमंत्री म्हणून गेले वर्षभर त्यांनी कामकाज केले. या वर्षभरात बेळगाव जिल्हा व कर्नाटक राज्यातील रेल्वेशी अनेक प्रलंबित विषय त्यांनी मार्गी लावले. 

दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाशी संबंधीत मार्गाची त्यांनी माहिती दिली होती. या रेल्वेमार्गासाठी 927 कोटी 40 लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली दिली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात म्हणजे 11 सप्टेंबर रोजी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. याची माहिती त्यांनी स्वतःच ट्विटरवरून दिली होती. बेळगावात उपचार घेतल्यानंतर आठवडाभरापूर्वी त्यांना दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण, उपचाराचा फायदा झाला नाही. 

हेही वाचा - मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड

अंगडी यांचे मूळ गाव बेळगाव तालुक्‍यातील के. के. कोप्प हे असून त्यांनी प्रारंभापासून भारतीय जनता पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. भारतीय जनता पक्षाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. 2004 साली ते सर्वप्रथम भारतीय जनता पक्षातून लोकसभेवर निवडून गेले होते. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union minister of state for railways suresh angadi passes away