upset Fans of Sangram Jagtap
upset Fans of Sangram Jagtap

संग्राम जगताप यांना डावलल्याने समर्थक नाराज 

नगर : राज्यात सत्तेवर आलेल्या नव्या महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाचा विस्तार करताना नगर जिल्ह्याचा उत्तर व दक्षिण असा मेळ घातलेला नाही. त्यात मंत्रिपदे वाटताना उत्तर नगर जिल्ह्यावर विशेष मेहेरबान असलेल्या सरकारने दक्षिण नगर जिल्ह्यावर मोठा अन्याय केल्याची भावना विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र आहे. सलग दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारास चितपट करणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांनाच मंत्रिपदासाठी डावलल्याने नाराज झालेले कार्यकर्ते श्रेष्ठींना भेटून भूमिका मांडणार आहेत. 

मरगळ आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आमदार संग्राम जगताप यांनीच ऊर्जितावस्था आणली. नगरच्या महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महापौर विराजमान केला. तसेच स्वत: महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतरही पक्षाच्याच नगरसेवकाला नगरचे महापौर केले. सार्वत्रिक निवडणुकीत परिवारातील सर्वच सदस्यांनी "राष्ट्रवादी'च्या घड्याळाला नगरमध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. 

त्यातही अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नगर लोकसभा मतदारसंघातून विखे परिवारासोबत लढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तगडा उमेदवार नव्हता. त्या वेळी केवळ ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आग्रहाखातर लोकसभेची निवडणूक लढवून राज्यातील बलाढ्य शक्ती असलेल्या विखे पाटील यांचे वारसदार डॉ. सुजय यांच्याशी कडवी झुंज दिली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही कोणत्याही मोठ्या नेत्याच्या सभेशिवाय नगर शहरातून एकहाती विजय मिळविला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगर जिल्ह्यातील अन्य आमदारांच्या तुलनेत जगताप दुसऱ्यांदा निवडून आलेले एकमेव आमदार आहेत. त्यामुळे नगर दक्षिणेचा समतोल साधण्यासाठी व वरिष्ठ आमदार म्हणून त्यांना नक्कीच संधी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा होती. त्यामुळे मंत्रिमंडळाची यादी जाहीर होईपर्यंत आशावादी असलेले कार्यकर्ते मंत्रिमंडळाची यादी जाहीर होताच कमालीचे नाराज झाले. या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे भावना मांडण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com