मी येतोय.. तुम्हीही नक्की या...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य
‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ उपक्रमाला गेली पाच वर्षे शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत मुलाखती रंगतील. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंगची नेटकी व्यवस्था असेल.

कोल्हापूर - ‘मी येतोय २८ फेब्रुवारीला कोल्हापुरात... तुम्हीही या संवाद साधायला...’ अभिनेता सुबोध भावे यांनी हे आवाहन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधण्याची ही पर्वणी ठरणार आहे.

 

दरम्यान, सलग पाचव्या वर्षी ही मुक्त संवाद मालिका होणार असून, नामवंत वक्‍त्यांची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. आपल्या आजवरच्या वाटचालीतील विविध अनुभवांची शिदोरी ही मंडळी यानिमित्ताने सर्वांसमोर रिती करतीलच; त्याशिवाय प्रत्येकातील नवचेतना जागवताना आपापल्या क्षेत्रात नेटाने पुढे जाण्यासाठीची ऊर्जाही देतील. कार्यक्रमाला सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेश असेल. 

‘सकाळ’ने चार वर्षांपूर्वी या अनोख्या उपक्रमाला प्रारंभ केला. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथाकार सुभाष घई, प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेता राहुल बोस, सयाजी शिंदे, भारत विकास ग्रुप- बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे हणमंतराव गायकवाड, ‘सुपर थर्टी’चे संस्थापक आणि गणितज्ज्ञ आनंद कुमार, ज्ञानेश्‍वर मुळे, प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर, भारतातील पहिली वाइन उद्योजिका अचला जोशी, प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र पटेल, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, कुशल संघटक प्रदीप लोखंडे, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, ग्लोबल वेलनेस ॲम्बॅसिडर रेखा चौधरी, दिग्दर्शक अभिनय देव, फ्लेम युनिव्हर्सिटीचे संस्थापक संचालक पराग शहा, ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर, दास ऑफशोअरचे अशोक खाडे, विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, अभिनेता श्रेयस तळपदे, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा, पद्मश्री शिखर नाईक यांच्याशी दिलखुलास संवाद साधण्याची संधी मिळाली होती. 
यंदाही अशाच नामांकित वक्‍त्यांची प्रभावळ लाभली आहे. चला तर मग, आजच वेळेचे नियोजन करूया. २८ फेब्रुवारी ते ३ मार्चची सायंकाळ नवप्रेरणादायी करूया...!

शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य
‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ उपक्रमाला गेली पाच वर्षे शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत मुलाखती रंगतील. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंगची नेटकी व्यवस्था असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urja - Sanwad Dheyvedyashi Sakal Event