फुले दाम्पत्याच्या काल्पनिक छायाचित्रांचाच वापर

फुले दाम्पत्याच्या काल्पनिक छायाचित्रांचाच वापर

कोल्हापूर - सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांचा अस्सल फोटो आणि आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची अस्सल तैलचित्रे १९ वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आहेत; मात्र बहुतेक ठिकाणी त्यांची काल्पनिक छायाचित्रेच लावली जात आहेत. अस्सल छायाचित्रे शासकीय मुद्रणालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जुनी आणि काल्पनिक छायाचित्रेच वापरत आहेत. याबाबत शासनस्तरावर कोणतीच पावले उचलली जात नाहीत. महापुरुषांचा सन्मान राखण्यासाठी अशा छायाचित्रांवर बंदी घालणे आवश्‍यकच आहे.

शासनाच्या अध्यादेशानुसार राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, कार्यालयप्रमुखांच्या कक्षांत महापुरुषांचे छायाचित्र लावणे बंधनकारक आहे. शासकीय मुद्रणालयातून महापुरुषांची अधिकृत छायाचित्रे घेऊन शासकीय खर्चातून त्यांची फ्रेम करून ते भिंतीवर लावण्याचा उल्लेख अध्यादेशामध्ये आहे, तरीही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यावर जळगाव येथील दिवंगत लक्ष्मण देवरे यांनी राज्यभरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांकडे महापुरुषांची छायाचित्रे लावण्याबाबतच्या शासकीय अध्यादेशांसह पत्रव्यवहार करून, भेटी देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता.

श्री. देवरे यांनी उतारवयातही महाराष्ट्र पिंजून काढला होता. मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांपासून ते ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, सरपंचांनी महापुरुषांची अधिकृत छायाचित्रे लावण्यासाठी राज्य शासनाला श्री. देवरे यांनी वारंवार परिपत्रक काढायला लावले. त्यांनी महापुरुषांच्या अस्सल छायाचित्रांबाबत अत्यंत निष्ठेने, तळमळीने राज्यभर जागृती केली.   

ज्येष्ठ संशोधक प्रा. हरी नरके यांनी अथक प्रयत्नांतून महात्मा फुले यांचे अस्सल कृष्णधवल छायाचित्र आणि सावित्रीबाई फुले यांची दोन अस्सल तैलचित्रे बनवून घेतली. शासनाने ती अधिकृतरीत्या प्रकाशितही केली. त्याला १९ वर्षे झाली; मात्र अद्यापही महापुरुषांच्या अस्सल छायाचित्रांबाबत अनभिज्ञ असल्याने अथवा त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची काल्पनिक छायाचित्रेच सार्वजनिक कार्यक्रमांत वापरल्याचे दिसून येते. ही छायाचित्रे रस्त्यावर स्वस्तात विकत मिळतात. महापुरुषांचा योग्य सन्मान राखला जावा, यासाठी शासनाने काल्पनिक छायाचित्रांवर बंदी घालणे आवश्‍यक आहे.

किंमत कमी हवी
शासकीय मुद्रणालयात महापुरुषांसह आजी, माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांची अधिकृत छायाचित्रांची छपाई करून विकली जातात. शासनाला त्यातून महसूलही मिळतो. महापुरुषांच्या छायाचित्रांना मोठी मागणी असते, तरीही छायाचित्रे संपल्यानंतर तातडीने छपाई केली जात नाही. सामाजिक संघटनांना याविरोधात आवाज उठवावा लागतो. पाच रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या छायाचित्रांच्या किमतीही ३० रुपयांपर्यंत वाढवल्यात. ही किंमत कमी करून ती प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याची मागणी 
केली जात आहे.

सावित्रीबाई फुले यांची तैलचित्रे अस्सल कृष्णधवल छायाचित्रावरून चित्रकारांनी तयार केली आहेत, तर महात्मा फुलेंचे कृष्णधवल छायाचित्रही निगेटिव्हवरून काढलेले आहे. सावित्रीबाईंची निळ्या साडीतील आणि लाल काठाच्या साडीतील अशी दोन तैलचित्रे आहेत. ती प्रकाशित करू शकलो याचा मला आनंद आहे; मात्र अद्यापही लोक जुनी आणि काल्पनिकच छायाचित्रेच वापरतात, यांची खंत वाटते.
- प्रा. हरी नरके,
ज्येष्ठ संशोधक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com