Video : संघर्ष 'उषाताईं'चा जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी

राजेश पाटील
Sunday, 8 March 2020

त्यांच्या मोटारीला भाडे आल्यास त्या स्वतः ड्रायव्हिंग करत सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूरपर्यंत गाडी चालवतात. महिलेला वाहन चालवताना बघून वाटेत अनेक जण त्यांचे कौतुकही करतात. या व्यवसायाने त्यांच्या संसाराला चांगली साथ दिलेली आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : संसाराचा गाडा ओढत असतानाच सात वर्षांपूर्वी काळाने घातलेल्या झडपेने पतीची साथ सुटली. तीन लहान मुलांना सोबत घेऊन फाटलेले आभाळ एकटीने शिवायचे तरी कुठे आणि कसं? असा प्रश्न समोर असतानाच, स्वतःला सावरत पुन्हा ती नव्या जिद्दीने आणि उमेदीने उभी राहिली. प्रवासी व भाजीपाला वाहतुकीसाठी फायनान्सवर मोटार खरेदी करून आठवडाभरात स्वतः ड्रायव्हिंगही शिकली.
 
आज याच मोटारीची चाके तिच्या संसार गाड्याची चाके बनून धावत आहेत. चार तास झोप आणि दिवसभर उन्हातान्हात होरपळ घेऊन येथील श्रीमती उषाताई वसंत दिंडे (वय 40) यांचा सुरू असलेला हा जिद्दीचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आणि तितकाच प्रेरणदायीसुद्धा ठरला आहे.
 
श्रीमती दिंडे यांच्या जीवनाच्या पुस्तकातील प्रत्येक पानावर जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी केलेला संघर्ष आहे. याच भागातील डोंगर पठारावरील अंब्रुळकरवाडी हे त्यांचं माहेर. अनेक वर्षांपासून येथील बडेकर हॉस्पिटलच्या परिसरातील भाड्याच्या खोलीत त्या आपल्या मुलांसमवेत राहण्यास आहेत. या कुटुंबाचे पूर्वी येथे कापड दुकान होते. अतिक्रमणात ते निघाल्यानंतर या दांपत्याने पोटापाण्यासाठी मुंबई गाठली. वसंतराव मुंबईत हमालीचे काम करायचे, तर शिवणकाम आणि खानावळ घालून उषाताई त्यांना साथ द्यायच्या. मात्र, चार वर्षांनंतर काही कारणास्तव मुंबई सोडून पुन्हा हे कुटुंब गावी आले. कपडे व कटलरी विक्रीचे फिरते दुकान त्यांनी सुरू केले.

नक्की वाचा :  सह्याद्री व्याघ्रत हाेतेय या प्राण्यांचेही दर्शन

सन 2013 मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर फाटलेलं आभाळ एकटीनं शिवायचं तरी कुठं आणि कसं? असा प्रश्न उषाताईसमोर असतानाच, स्वतःला सावरत पुन्हा त्या नव्या जिद्दीने आणि उमेदीने उभ्या राहिल्या. व्यावसायिक अनुभव पाठीशी होताच, त्याला आणखी चांगले स्वरूप देऊन उत्पन्न वाढीसाठी त्यांनी प्रवासी व माल वाहतुकीसाठी फायनान्सवर टाटा मॅजिक मोटार खरेदी केली. आठवडाभरात त्यावर स्वतः ड्रायव्हिंगही शिकल्या. लायसन्स काढले. आता सात वर्षांपासून त्यांचा हा भाजीपाल्याचा व्यवसाय अथकपणे सुरू आहे. दररोज पहाटे साडेतीन-चार वाजता त्या मोटारीला स्टार्टर मारतात. तासाभरात कऱ्हाडच्या मार्केट यार्डला पोचून त्यांच्यासह बाजारातील इतर महिला व्यापाऱ्यांसाठी खरेदी केलेला भाजीपाला मोटारीत भरून त्या परत येथे येतात. ढेबेवाडीसह विभागातील विविध आठवडा बाजारात त्यांचे भाजीपाल्याचे दुकान लावलेले असते.

त्याशिवाय अधूनमधून मोटारीला भाडे आल्यास त्या स्वतः ड्रायव्हिंग करत सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूरपर्यंत गाडी चालवतात. महिलेला वाहन चालवताना बघून वाटेत अनेक जण त्यांचे कौतुकही करतात. या व्यवसायाने त्यांच्या संसाराला चांगली साथ दिलेली आहे. मोठ्या मुलीचे लग्न, घरासाठी जागा खरेदी आणि थोडीफार कर्जफेडही त्यातून झालेली आहे. स्वतःचे शिक्षण कमी असले, तरी मुलांना मात्र उच्चशिक्षित करण्यासाठी उषाताईंची धडपड सुरू आहे. त्यांची थोरली मुलगी बीएस्सी नर्सिंग असून, दुसरी फार्मसीला आहे. मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ushatai Dinde Runs Her Business On Transport Vehicle