#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन

#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन

कऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभयारण्यापाठोपाठ आता पुण्यातील राजीव गांधी पार्कमधील सांबरांचे पुनर्वसनाला गती मिळणार आहे. त्यामुळे जंगलातच खाद्य उपलब्ध होणार असून, बिबट्यासह श्वापदांची नागरी वस्तीकडील कुच रोखली जाणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ व बिबट्यासह अन्य श्वापदांची संख्या जास्त आहे. त्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे. नुकत्याच झालेल्या वन्य गणनेतही बिबट्याचे सहज दर्शन होत आहे. त्यांना जंगलात मुबलक अन्न उपलब्ध होत नसल्याने बिबट्यासह श्वापदांचा हल्ला नागरीवस्तीकडे वळत आहे. त्यात बिबट्यांची संख्या जास्त आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील दीडशे तर पाटण तालुक्‍यातील सुमारे सत्तर गावांत बिबट्याने झेप घेतली आहे. त्याचा वावर नेहमीचाच झाल्याने मानव विरुद्ध श्वापद अशा संर्घषाचा टप्पा आला आहे. तो संघर्ष कमी करण्यासाठी वन्यजीव विभागाने वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य भेकर व सांबरांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या सह्याद्री व्याघ्रमध्ये कमी आहे. सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्यातून पन्नासवर भेकर सह्याद्रीत पुनर्वसित करण्याबाबतचा प्रस्ताव झाला. त्यासाठी प्राथमिक टप्प्यात 50 लाखांचा निधी मंजूर झाला. त्याप्रमाणे सागरेश्वरमधून भेकर सह्याद्रीत पुनर्वसित करण्यात आली. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणून पुण्याच्या राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर सह्याद्रीत पुनर्वसित करण्यात येणार होते. पुण्याच्या झुमध्ये त्यांची संख्या वाढल्याने त्यांना तेथे भेकर ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांनी वर्षभरापूर्वी सह्याद्री व्याघ्रला कळवले होते. त्यानुसार तेथील काही भेकर मध्यंतरी येथे पुनर्वसित येणार होती. प्रायोगिक तत्त्वावर काही प्रयोग झाले. मात्र, अजूनही काही भेकरांचे पुनर्वसन होणार होते. त्याला शासकीय ब्रेक लागला.
 
हेही वाचा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनवेची थरारक रात्र

व्याघ्र प्रकल्पाचे संचालक क्‍लेमेंट बेन यांच्या नेतृत्वाखाली योजना राबवली जात आहे. भेकरांसह सांबरांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वातावरण पोषक आहे, तसा अभ्यासकांचा अहवालही आला आहे. वन्यजीव विभागाने ती गोष्ट लक्षात घेवून त्या प्रस्तावाला गती देण्याचा विचार केला आहे. व्याघ्र प्रकल्पात भेकरांसाठी मुबलक गवत व पाणी आहे. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात गवताळ प्रदेश तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात सोलापूर येथील प्राणी संग्रहालयातून काही भेकर येथे आणले जाणार आहेत. त्यामुळे सह्याद्रीत भेकरांसह हरणांची संख्या वाढणार आहे. 

वाचा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या वाटांवर 43 ठिकाणी संरक्षण कुटी

याबराेबरच नेहमी पाण्याच्या तळ्याशेजारी राहणारा आणि बिबट्याचे आवडते खाद्य चौशिंगा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाढू लागलेला आहे. वन्य जीव विभागाने खास बाब म्हणून व्याघ्र प्रकल्पात निर्माण केलेल्या गवताळ प्रदेशामुळे त्यांची संख्या वाढल्याचे वन्य जीव विभागातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे बिबट्या, वाघाचे खाद्य जंगलात उपलब्ध होणार आहे.
 
व्याघ्र प्रकल्पात हरण, भेकरासह चौशिंगाचे वास्तव्य पर्यटकांसाठी अधिक प्रेक्षणीय ठरते आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पक्षी, प्राण्यांचे अस्तित्व आहे. त्यात हरिण व भेकराची संख्या जास्त आहे. व्याघ्र प्रकल्पामध्ये अनेक कामे हाती घेतली आहेत. त्यात सागेश्वर येथील हरिणांचेही येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात हरीण स्थलांतरित झाली आहेत. वन्यजीव विभागाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून तो कार्यरत आहे. त्यातच गवताळ भागात आढळणारा चौशिंगा येथे दिसू लागला आहे. त्यामुळे गवताळ प्रदेश उपलब्ध करण्याचा वन विभागाचा प्रकल्प यशस्वी होताना दिसतो आहे. चौशिंगाचे वास्तव्य गवताळ भागात निश्‍चित असते. अलीकडच्या काळात पर्यटकांना चौशिंगा सहज दिसत नव्हता.

हेही वाचा : ट्रेकर्स म्हणतात पुन्हा येईन...पुन्हा येईन...

वन विभाग आणि शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात केलेल्या कामामुळे चौशिंगा सहज नजरेस पडतो आहे. पठारांवर हरण व भेकरासारखा दिसणारा चौशिंगा पर्यटकांचे नक्कीच आकर्षण ठरतो आहे. व्याघ्र प्रकल्पात वाढलेला गवताळ प्रदेश व पाणवठ्यांच्या वाढलेल्या संख्येने चौशिंगाचा वावर वाढला आहे. चौशिंगा भारताच्या मध्य व पूर्व भागात दिसतो. त्याला माळसड असेही म्हणतात. मे ते जून असा त्याचा विणीचा हंगाम आहे. झाडांची कंद, छोटी झुडपे, हिरवी पाने आदी त्याचे आवडते खाद्य आहे. चौशिंगाचे जंगलातील वाढते प्रमाण पर्यावरणीय समतोलासाठी चांगले असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. बिबट्याचे खाद्य जंगलातच वाढल्याने त्याचे मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण नक्कीच घटणार असल्याचा विश्‍वास वन खाते व्यक्त करत आहे. पाटण, कोयना, चांदोली, वाल्मीक पठार व कोकण कड्याभोवती चौशिंगाचे अस्तित्व अनेक अभ्यासकांनी नोंदवले आहे. त्यामुळे त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

भेकरांची संख्या वाढणार 

वाघ, बिबट्याचे खाद्य म्हणून भेकर व सांबर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसित करण्यात येत आहेत. यापूर्वी सागरेश्वर अभयारण्यातून भेकर येथे दोन वेळा आणली आहेत. काही राजीव गांधी झूमधूनही आणली. त्यामुळे आता त्या प्रकल्पाला गती येणार असून, वन्यजीव विभागाने तसा प्रस्ताव केला आहे. तिसऱ्या टप्प्यात सोलापूर येथील प्राणी संग्रहालयातील भेकरही येथे पुनर्वसित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात त्यांची संख्या वाढणार आहे. 
 


सांबर व भेकर यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय दोन वर्षांपासून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो निर्णय अत्यंत चांगला आहे. श्‍वापदांचे खाद्य जंगलात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राजीव गांधी व सागरेश्वर येथून सांबरांचे होणारे पुनर्वसन व्याघ्र प्रकल्पासाठी निश्‍चित फायदेशीर आहे. 

रोहन भाटे, निसर्ग व प्राणी अभ्यासक, कऱ्हाड.

Video Courtsey : Doordarshan Sahyadri 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com