मांगलेतील भाजी बाजार, जनावरांचा बाजार पुन्हा बंद

भगवान शेवडे
Thursday, 16 July 2020

"कोरोना' च्या पार्श्वभूमीवर 25 मार्चपासून येथे आज भरणारा आठवडा भाजी बाजार व जनावरांचा बाजार पुन्हा बंद करण्यात आला.

मांगले : "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर 25 मार्चपासून येथे आज भरणारा आठवडा भाजी बाजार व जनावरांचा बाजार पुन्हा बंद करण्यात आला. अंदाज घेण्यासाठी शेतकरी, स्थानिक व्यावसायिकांना बसवण्यात आले होते. तहसीलदार गणेश शिंदे यांनी बाजार हटवण्यास सांगितले. त्यानंतर बाजार बंद करण्यात आला. 

येथील आठवडा बाजार चार महिन्यांपासून बंद असल्याने ग्रामीण शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. मुख्य बाजार पेठेशेजारी शिराळा ते वारणानगर रस्त्याच्या बाजूला प्रशस्त बाजार कट्टे आहेत. कोरोनामुळे तिथे बाजार भरत नाही. स्थानिकांसह पंचक्रोशीच्या 15-20 गावातील शेतक-यांकडे भाजी असूनही विकता येत नाही. 

काही शेतकरी ऊसाला पर्याय म्हणून भाजीपाला पिकवतात. त्यांना मांगलेचा बाजार हुकमी आहे. मात्र चार महिन्यांपासून बाजार भरला नाही. भाजीपाला व्यापा-यांना कवडीमोल दराने विकून मिळेल त्यात समाधान मानावे लागत आहे. हुकमी पैसे मिळणारे दुसरे उत्पन्न नसल्याने शेतक-यांची आर्थिक कोंडी सुरू आहे. स्थानिक शेतक-यांना तरी प्रशस्त बाजार कट्ट्यावर नियम घालून देऊन बाजार सुरु करण्याची मागणी शेतकरी, स्थानिक व्यापा-यांनी केली आहे. 

दरम्यान, जनावरांच्या बाजारालाही मोठी परंपरा आहे. तो बंद असल्यामुळे जनावरे खरेदी विक्री व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला. सोशल डिस्टन्चिी अट घालून बाजार 
कट्ट्यावर बाजार भरवावा, अशी मागणी आहे. 

"लोकांच्या भावना व गरज लक्षात घेऊन आज भाजीपाला विकण्यासाठी परवानगी दिली होती. जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाचा विचार करुन तहसीलदार गणेश शिंदे यांचा आदेश येताच बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढील आदेश येईपर्यंत निर्णय कायम राहिल.'' 
- धनाजी नमुने, उपसरपंच 

सांगली

सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable market in Mangle, animal market closed again