वेण्णालेकच्या सांडव्यावरून पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

महाबळेश्वर - गेल्या दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे वेण्णालेक दुथडी भरून वाहू लागले आहे. काल (ता. ७) पहाटे वेण्णालेकच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. काही काळ महाबळेश्वर-पाचगणी रस्ता जलमय झाल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. 

महाबळेश्वर - गेल्या दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे वेण्णालेक दुथडी भरून वाहू लागले आहे. काल (ता. ७) पहाटे वेण्णालेकच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. काही काळ महाबळेश्वर-पाचगणी रस्ता जलमय झाल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. 

महाबळेश्वर व तालुक्‍यात गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने महाबळेश्वरकरांची जीवनवाहिनी असलेले, नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक तुडुंब भरले. जून महिन्याच्या प्रारंभी शहर व परिसरात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र, जून महिनाअखेरीस व जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाची धुवाधार बॅटिंग महाबळेश्वर तालुक्‍यात पाहावयास मिळाली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने महाबळेश्वर-पाचगणी रस्ता जलमय झाला. काही काळ वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. विकेंड असल्याने असंख्य पर्यटक येथे दाखल झाले असून पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत. 

येथील प्रसिद्ध वेण्णालेकवर पर्यटकांची गर्दी झालेली पाहावयास मिळाली. हौशी पर्यटक भर पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत. सोबतच गरमागरम मक्‍याचे कणीस, पॅटिसवर ताव मारताना तर, काही भर पावसात घोडेसवारी करताना दिसून येत आहे. मुख्य बाजारपेठेतही पर्यटकांची खरेदीसाठी गर्दी आहे. येथील प्रसिद्ध चप्पल, जॅम, जेली, फजसह उबदार कपड्यांच्या खरेदीकडे पर्यटकांचा कल होता. येथील केट्‌स पॉइंट घाटातील धबधबे ओसंडून वाहत असून पर्यटक अशा ठिकाणी वेळ घालवताना पाहावयास मिळत आहेत. 

झाडे उन्मळून पडल्याने नुकसान
महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वत्रच मुसळधार पाऊस पडत असून नद्या, ओढे, नाले ओसंडून वाहू लागलेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झोडे उन्मळून पडण्याचे, संरक्षक भिंत कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. हवमान खात्याच्या माहितीप्रमाणे महाबळेश्‍वर परिसरात कालअखेर १४६७.५ मिमी (५८ इंच) पावसाची नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: venna lake water