व्हेंटिलेटर... एकाचा श्‍वास थांबल्यावरच दुसऱ्याला; सुन्न करणारे वास्तव.. वाचा कुठे?

अजित झळके
Tuesday, 15 September 2020

"व्हेंटिलेटर मिळू शकेल; मात्र लगेच नाही. सध्या व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला तरच तो रिकामा होईल.' स्वतःच्या प्रिय नातलगाला वाचवण्यासाठी धावणारा "माणूस' स्तब्ध झाला... कुणाचा तरी श्‍वास चालू राहण्यासाठी कुणाचा तरी श्‍वास थांबावा लागेल... हे सारे धक्कादायकच !

डॉक्‍टरांनी सूचना केली, "रुग्णाची प्रकृती ढासळली आहे. व्हेंटिलेटरचा बेड पाहावा लागेल'. नातेवाईक धावायला लागले. सगळ्या रुग्णालयांत शोध सुरू झाला. एका बड्या रुग्णालयातील डॉक्‍टरांनी सांगितले, "व्हेंटिलेटर मिळू शकेल; मात्र लगेच नाही. सध्या व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला तरच तो रिकामा होईल.' स्वतःच्या प्रिय नातलगाला वाचवण्यासाठी धावणारा "माणूस' स्तब्ध झाला... कुणाचा तरी श्‍वास चालू राहण्यासाठी कुणाचा तरी श्‍वास थांबावा लागेल... हे सारे धक्कादायकच ! हेच वास्तव आहे आजच्या कोरोना संकटातील व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेचे. झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या, त्यात प्रकृती ढासळण्याचे वाढलेले प्रमाण आणि त्यामुळेच वाढलेला मृत्यू दर तेच सांगतोय. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार कोरोनाबाधित रुग्णांपैकी सुमारे 20 टक्के रुग्णांना ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज लागू शकते. त्या हिशेबाने ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. भारतात इस्त्रोनेही व्हेंटिलेटरची निर्मिती सुरू केली असून मारुती-सुझुकी ही वाहन कंपनी ऍग्वा हेल्थ केअर कंपनीसोबत मिळून निर्मिती करत आहे. उद्योगधंद्याचा ऑक्‍सिजन पुरवठा कमी करून तो रुग्णसेवेसाठी उपलब्ध केला जात आहे. तरीही संकट मोठे आहे. ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर यंत्रणेसोबतच ती यंत्रणा हाताळण्यातील तज्ज्ञांची मर्यादित संख्या हाही चिंतेचा विषय आहे. सांगली जिल्ह्यात राज्यासह देशभरातून शक्‍य तेथून व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. 

व्हेंटिलेटरचे काम... 
बाधित रुग्णाची तब्येत जर जास्तच बिघडली, तर विषाणू फुफ्फुसांचं वेगानं नुकसान करू शकतात. जेव्हा विषाणू शरीरात घुसतो तेव्हा शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा त्या विषाणूला ओळखते. रक्तवाहिन्यांचं प्रसरण होतं आणि जास्त प्रमाणात इम्युन सेल्स रिलिज होतात. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये पाणी तयार होतं. श्‍वास घेण्यास त्रास होतो आणि शरीरातल्या ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होत जाते. व्हेंटिलेटरमधून फुफ्फुसांमध्ये हवा भरली जाते आणि ऑक्‍सिजनची लेव्हल वाढायला लागते. या काळात पेशंटला अशी औषधं दिली जातात, ज्यामुळे शरीरातल्या रेस्पिरेटरी मसल्स शिथिल केल्या जातात. म्हणजेच पेशंटचं श्‍वास घ्यायचं काम ते व्हेंटिलेटर करतं. 

व्हेंटिलेटरमध्ये दोन प्रकार

व्हेंटिलेटरमध्ये दोन प्रकार आहेत. एक नॉन इन्व्हेंजीव व्हेंटिलेटर आणि इन्व्हेंजीव व्हेंटिलेटर... यात नॉन इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची वाचण्याची शक्‍यता अधिक असते. इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरमध्ये नळीद्वारे श्‍वास द्यावा लागतो. ही प्रक्रिया अधिक क्‍लिष्ट असते आणि यात रुग्णाच्या बचावण्याची शक्‍यता कमी होत जाते. 

- डॉ. अनिल मडके, श्‍वास रोगतज्ज्ञ, सांगली. 

सध्याची स्थिती

  • जिल्ह्यात व्हेंटिलेटर : 161 
  • इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवरील रुग्ण : 07 
  • नॉन इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवरील रुग्ण : 109 
  • ऑक्‍सिजनवरील रुग्ण : 771 
  • नेझल ऑक्‍सिजनवरील रुग्ण : 51 
  • संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ventilator... only when one stops breathing; Reality in miraj corona hospital's