Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात पाच ठिकाणी युतीसमोर बंडखोरांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीतील अर्ज माघारीनंतर एकही बंडखोर दिसणार नाही, या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता जिल्ह्यातील दहापैकी पाच मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनीच आपली बंडखोरी कायम ठेवली आहे.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीतील अर्ज माघारीनंतर एकही बंडखोर दिसणार नाही, या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता जिल्ह्यातील दहापैकी पाच मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनीच आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ठिकाणीच बंडखोरी झाल्याने युतीसमोर या बंडखोरांचे आव्हान असणार आहे. 

बंडखोरी केलेल्या प्रमुखांत "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोक माने, आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी, "गोकुळ' चे संचालक अनिल यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल देसाई, राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील - यड्रावकर, काँग्रेसचे सत्यजित जाधव, अरूण डोंगळे, शिवसेनेचे अनिरूध्द रेडेकर, संदीप दबडे, "जनसुराज्य'चे राजीव आवळे आदींचा समावेश आहे. 

युतीत जिल्ह्यातील दहापैकी आठ मतदार संघ शिवसेनेला तर दोन मतदार संघ भाजपकडे आहेत. आघाडीत सात मतदार संघ काँग्रेसकडे तर तीन राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेसच्या सातपैकी शाहुवाडीत त्यांचा उमेदवारच नाही, शिरोळची जागा काँग्रेसने स्वाभिमानीला सोडली आहे. त्यामुळे उर्वरित पाच मतदार संघातच काँग्रेसचे उमेदवार चिन्हावर लढत आहेत.

काँग्रेस - राष्ट्रवादीत शिरोळच्या श्री. यड्रावकर, राधानगरीतील सत्यजित जाधव, डोंगळे यांच्या व्यतिरिक्त अन्य मतदार संघात कोणाची बंडखोरी नाही. भाजपमध्ये मात्र तब्बल पाच मतदार संघात बंडखोरी केली आहे. यातील बहुंताशी बंडखोर भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन जनसुराज्य शक्तीपक्षाच्या चिन्हावर रिंगणात उतरले आहेत. 

हातकणंगलेतील "स्वाभिमानी' ची संभाव्य बंडखोरी वैभव कांबळे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने टळली. चंदगडमध्येही ऐनवेळी आमदार कुपेकर यांच्या गटाकडून अर्ज दाखल केलेले विलास पाटील यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीतील बंडखोरी टळली. इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, उत्तर व करवीरमध्ये युती आणि आघाडीतही बंडखोरी झालेली नाही. शाहुवाडीत गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा उमेदवार होता, पण यावेळी या दोन्हीही पक्षांचा उमेदवार नाही, पण बंडखोरीही कोणत्याच पक्षातून झालेली नाही. 

मतदारसंघनिहाय जिल्ह्यातील बंडखोर असे -
 

उमेदवार                 मुळचापक्ष     बंडखोरीनंतरचा पक्ष 

शिरोळ मतदारसंघ  

अनिल यादव                 भाजप         जनसुराज्य 
राजेंद्र पाटील-यड्रावकर   राष्ट्रवादी कॉंग्रेस      अपक्ष 

हातकणंगले मतदारसंघ

अशोक माने                  भाजप            जनसुराज्य 
राजीव आवळे                जनसुराज्य          अपक्ष 
संदीप दबडे                  शिवसेना              अपक्ष 

राधानगरी मतदारसंघ

अरूण डोंगळे                 कॉंग्रेस                अपक्ष 
सत्यजित जाधव            कॉंग्रेस               अपक्ष 
राहूल देसाई                   भाजप               अपक्ष 

कागल मतदारसंघ

समरजितसिंह घाटगे         भाजप              अपक्ष 

चंदगड मतदारसंघ

अशोक चराटी                  भाजप           जनसुराज्य 
शिवाजी पाटील               भाजप            अपक्ष 
अनिरूध्द रेडेकर             शिवसेना         अपक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Challenge of the rebels in front of the Alliance in five places