Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत

Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत

कोल्हापूर - जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत दुरंगी व बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी काँटे का मुकाबला आहे. ताकदवान उमेदवार ‘अभी नहीं तो कभी नही’ अशा तयारीने रिंगणात उतरले आहेत. आपली बाजू भक्‍कम करण्यासाठी ते पैशाचा पाऊस पाडू लागले आहेत, तर पैशाने विकत न येणाऱ्यांना पदाचे स्वप्न दाखवले जात आहे. कोणाला ‘गोकुळ’, तर कोणाला जिल्हा परिषद, जिल्हा बॅंकेत संधी देण्याचा शब्द दिला जात आहे. दुसऱ्या बाजूला पैसा, पद, नोकरीचे आमिष दाखवूनही जे सहकार्य करत नाहीत, त्यांना धमकावण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत.

दक्षिणमध्ये महाडिक- पाटील यांच्यात महामुकाबला 

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार अमल महाडिक व काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात महामुकाबला सुरू आहे. पाटील आणि महाडिक कुटुंबाने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. या मतदारसंघात टिपेचा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकेक मतासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. यातूनच एकमेकाच्या गटांना सुरुंगही लावला जात आहे. पाटील गटाकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, तर महाडिक गटाकडून माजी खासदार धनंजय महाडिक सूत्रे फिरवत आहेत. महाडिक गटाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना, तर पाटील गटाने भाजपच्या नगरसेवकांना खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

करवीरमध्ये नरके - पी.एन. पाटील यांच्यात सरळ लढत

करवीर मतदारसंघात दुरंगी लढत आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील अशी सरळ लढत आहे. पाटील गटाने नरके गटाला खिंडार पाडले. नरके यांच्या कारखान्याच्या पाच माजी संचालकांना बरोबर घेऊन कारखाना कार्यक्षेत्रात त्यांनी धडक दिली. तसेच बाजार भोगाव, धामणी खोरे, शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघात पाटील यांनी चांगली मुसंडी मारली आहे. तर आमदार नरके यांनीही पाटील गटाला डॅमेज करण्याचा विडाच उचलला आहे. त्यांनी गतवेळीप्रमाणे शेकाप आणि भाजपची मदत मिळवण्यात यश मिळवले आहे. तसेच संभाजी कापडे, रवी मडके, प्रकाश पाटील, सर्जेराव हुजरे यांना बरोबर घेऊन पी. एन. पाटील गटाला धक्‍का दिला आहे. पी. एन. गटाचे कट्टर समर्थक राहिलेले व जिल्हा परिषद माजी अध्यक्षा विमल पाटील यांचे पती पुंडलिक पाटील यांनी नरके यांना दिलेला पाठिंबा पाटील यांना सर्वांत मोठा धक्‍का आहे. 

राधानगरी-भुदरगडमध्ये आबिटकर-के.पी.पाटील लढत

राधानगरी - भुदरगडमधून गतवेळी आमदार प्रकाश आबिटकर यांना मोठी रसद देण्यात आली होती. अनेक गट-तट त्यांना मिळाले. मात्र, आता बरेच गट राष्ट्रवादीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्यासाठी सक्रिय झाले आहेत. बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगले, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले आदी गट के. पी. पाटील यांच्या प्रचारात आहेत. अभिजित तायशेटे गट अजून संभ्रमावस्थेत आहेत. प्रकाश आबिटकर यांनीही के. जी. नांदेकर, पंचायत समिती सदस्य भरत पाटील, अशोक फराकटे, भांदिगरे, संजय पाटील, नंदकुमार सूर्यवंशी आदींना आपल्यासोबत घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

चंदगडमध्ये बहुरंगी लढती

चंदगड मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र होते. मात्र, काही उमेदवारांनी पैसा व दमदाटीचा वापर करत अनेक उमेदवारांना रिंगणातून माघारी पाठवले. माघारीनंतर जे शिल्लक आहेत, त्यांच्यावरही दबाव टाकून पाठिंबा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे राजेश पाटील, जनसुराज्यचे अशोक चराटी, शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर व अपक्ष शिवाजी पाटील असा सामना आहे. एक-दुसऱ्याचे गट फोडण्यासाठी या ठिकाणी मोठ्या जोडण्या सुरू आहेत. 

हातकणंगले, शिरोळमध्ये चाैरंगी लढत

शिरोळमध्ये चौरंगी लढत आहे. या चारही गटांचा डोळा दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या मतांवर आहे. या गटाला आपल्यासोबत घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हातकणंगलेतही चौरंगी लढत सुरू आहे. सर्वच गटांची कमीअधिक प्रमाणात सारखीच ताकत आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. सुजित मिणचेकर, काँग्रेसचे राजूबाबा आवळे, भाजपमधून जनसुराज्यमध्ये गेलेले अशोक माने व ताराराणी पक्षाचे किरण कांबळे यांच्यात प्रमुख लढत आहे. वरवर दिसणारे चित्र आतून मात्र फार वेगळे आहे. उलटसुलट, छुप्या पद्धतीने सुरू असलेला प्रचार याठिकाणी निर्णायक ठरणार आहे. 

इचलकंरजीत एकास-एक लढत

इचलकरंजीत एकास एक लढत सुरू आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार कोणाची मतं घेणार यावरच भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर व अपक्ष प्रकाश आवाडे यांचे भवितव्य अवलंबून आहे. आवाडे यांनी गटाकडे ओढण्याचा धडाका लावला आहे. सागर चाळके आणि ग्रुपला बरोबर घेत विरोधकांना चांगलाच चकवा दिला आहे.

शाहूवाडीत गड राखण्यासाठी पाटलांनी कंबर कसली

शाहूवाडी-पन्हाळ्याचा गड राखण्यासाठी शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी कंबर कसली आहे. मात्र, गेली पाच वर्षे या मतदारसंघात पेरणी आणि फोडाफोडीचे राजकारण करत जनसुराज्य शक्‍तीचे नेते विनय कोरे यांनीही चांगलीच मजल मारली आहे. 

कोल्हापूर उत्तरमध्ये जाधवांची उमेदवारी चर्चेत

कोल्हापूर उत्तरमध्ये सेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांना एकतर्फी वाटणारी निवडणूक आता हळूहळू बरोबरीकडे चालली आहे. काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांना मिळणारा प्रतिसाद आणि सक्रिय काँग्रेस-राष्ट्रवादी व छुपा पाठिंबा, यामुळे जाधव यांची उमेदवारी चर्चेत आली आहे. 
बहुचर्चित कागल येथे तिरंगी लढत होत आहे. विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना घेरण्यासाठी सेनेचे संजय घाटगे व अपक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कंबर कसली आहे. खासदार संजय मंडलिक हे संजय घाटगे यांच्यासाठी जोडण्या लावत आहेत. काँग्रेसचा एक मोठा गट त्यांच्या गळाला लागला आहे. पुढील टप्प्यातही अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com